जाती निर्मूलनाच्या लढाईची पुन्हा गरज
By Admin | Updated: November 10, 2014 00:59 IST2014-11-10T00:59:44+5:302014-11-10T00:59:44+5:30
जातीभेद हा देशाला लागलेला एक कलंक आहे. परंतु सध्या जातीनिर्मूलनाचे काम फारसे होताना दिसून येत नाही. उलट जातीच्या राजकारणाला अधिक वाव दिला जात आहे. जाती कशा मजबूत होतील

जाती निर्मूलनाच्या लढाईची पुन्हा गरज
ज्योती लांजेवार प्रथम स्मृतिदिन : पुष्पा भावे यांचे प्रतिपादन
नागपूर : जातीभेद हा देशाला लागलेला एक कलंक आहे. परंतु सध्या जातीनिर्मूलनाचे काम फारसे होताना दिसून येत नाही. उलट जातीच्या राजकारणाला अधिक वाव दिला जात आहे. जाती कशा मजबूत होतील असाच एकूण सर्व प्रकार सुरू आहे, त्यामुळे जाती निर्मूलनाच्या लढाइची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन प्रख्यात समीक्षक प्रा. पुष्पा भावे यांनी आज येथे केले.
प्रख्यात कवयित्री दिवंगत डॉ. ज्योती लांजेवार यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त डॉ. ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठान नागपूरद्वारा रविवारी विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सीताबर्डी येथील अर्पण सभागृहात एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन प्रा. पुष्पा भावे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ कवी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे विशेष अतिथी होते.
प्रा. पुष्पा भावे पुढे म्हणाल्या, आंबेडकरी विचारांची पोत जपत जातीनिर्मूलनाची चळवळ राबविण्याचे काम दिवंगत डॉ. ज्योती लांजेवार यांनी केले. एखाद्या संमेलनात ज्योती लांजेवार असल्या की बोलणारी पुरुष मंडळी चूप बसायची. आंबेडकरी चळवळीतील समाजकारण-राजकारणाला अखिल भारतीय पातळीवर नेतृत्व पुरविणाऱ्या त्या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. अरुण शौरी यांनी बाबासाहेबांच्या विरोधात केलेल्या उल्लेखाला संयमानं आणि मुद्देसूदपणे उत्तर देण्याचे काम ज्योती लांजेवार यांनी केले होते. आज देशात स्वच्छता अभियानाच्या नावावर मोठा गाजावाजा केला जात आहे. परंतु गांधीजींनी केवळ बाह्य स्वच्छतेबाबतच सांगितले नव्हते. तर आंतरिक मनामध्ये असलेली गढुळताही स्वच्छ करावी, असे सांगितले होते. स्वच्छतेच्या नावावर शब्दांचे राजकारण सुरू आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. अनेक कार्यकर्ते म्हणतात की सध्याचा काळ कठीण आहे. परंतु या कठीण काळातच काम करण्याची खरी गंमत असते. चळवळीत काम करणाऱ्यांनी आज खऱ्या अर्थाने सजगपणे राहून अपला शत्रू कोण आहे, हे ओळखून अतिशय संयमाने ही चळवळ पुढे नेण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, आपली संस्कृती व भारतीय वातावरणाची पेरणी ही ज्योती लांजेवार यांच्या कवितेचे मर्म होते. ज्योती लांजेवार या परिवर्तनवादी चळवळीच्या पाईक होत्या. डॉ. लांजेवार यांचे प्रतिष्ठान हे वैचारिक परिवर्तनाची शाळा व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. अनिल नितनवरे संपादित डॉ. ज्योती लांजेवार यांच्या कवितांच्या ‘पोस्टर पोएट्री’चे तसेच संगीता महाजन यांच्या डॉ. ज्योती लांजेवार यांच्या कवितांवरील फोटो -पोएट्री’चे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
त्याचे उद्घाटन सुद्धा प्रा. पुष्पा भावे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. अपर्णा लांजेवार-बोस यांनी प्रास्ताविक केले. अजय गंपावार यांनी संचालन केले. प्रसेनजित गायकवाड यांनी आभार मानले. डॉ. अजय चिकाटे, डॉ. विलास वाघ, शैल जैमिनी, डॉ. अशोक भस्मे, सुनिता झाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)