पॅकेजसाठी राष्ट्रवादीचा कोल्हापुरात मोर्चा

By Admin | Updated: June 7, 2015 01:40 IST2015-06-07T01:40:04+5:302015-06-07T01:40:04+5:30

राज्य सरकारने साखर कारखान्यांना जाहीर केलेले दोन हजार कोटींचे पॅकेज त्वरित द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने शनिवारी कोल्हापुरात मोर्चा काढला.

NCP's Kolhapur Morcha for the package | पॅकेजसाठी राष्ट्रवादीचा कोल्हापुरात मोर्चा

पॅकेजसाठी राष्ट्रवादीचा कोल्हापुरात मोर्चा

कोल्हापूर : राज्य सरकारने साखर कारखान्यांना जाहीर केलेले दोन हजार कोटींचे पॅकेज त्वरित द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने शनिवारी कोल्हापुरात मोर्चा काढला. सहकारमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चाचे नियोजन केले होते; पण पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने ‘यू’ टर्न घेत मोर्चा हॉकी स्टेडियमकडे वळविण्यात आला. तेथे मंत्री पाटील व आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा झाली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रश्नाबाबत बुधवारी (दि. १०) सर्व विभागांच्या सचिवांची तातडीची बैठक बोलावली असून, यामध्ये पॅकेजचा निर्णय होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ३० जूनपूर्वी पॅकेजची रक्कम कारखान्यांच्या खात्यांवर जमा होईल, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला दिले.
शनिवारी सकाळी दहापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मैलखड्डा येथील मैदानावर एकत्रित येत होते. दुपारी साडेबारा वाजता मेळाव्यास सुरुवात झाली. यावेळी केंद्र व राज्य सरकारवर आमदार हसन मुश्रीफ यांनी सडकून टीका केली़ त्यानंतर दुपारी सव्वा दोन वाजता मेळाव्याच्या ठिकाणाहून मोर्चा निघाला. निर्माण चौकातच पोलिसांनी मोर्चा अडवून हॉकी स्टेडियमकडे वळविला. चौकात मोर्चा थांबवून आमदार मुश्रीफ, खासदार महाडिक, निवेदिता माने, आमदार कुपेकर, ए. वाय. पाटील, के. पी. पाटील आदींचे शिष्टमंडळ चंद्रकांत पाटील यांंना भेटले. (प्रतिनिधी)
३० जूनच्या आधी कारखान्यांच्या खात्यांवर पैसे
राज्यातील शेतकरी व साखर कारखान्यांची आर्थिक परवड पाहून त्यांना दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची आम्ही घोषणा केली आहे. हे पॅकेज देणारच आहोत; पण काही तांत्रिक अडचणी सोडविण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करीत आहोत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. १०) सर्व विभागांच्या सचिवांची तातडीची बैठक बोलावली असून, यामध्ये पॅकेजचा निर्णय होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ३० जूनपूर्वी पॅकेजची रक्कम कारखान्यांच्या खात्यांवर जमा होईल, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

Web Title: NCP's Kolhapur Morcha for the package

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.