आघाडी सरकारने केली नागपुरची उपेक्षा - मुख्यमंत्र्यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 20:12 IST2016-07-31T20:12:15+5:302016-07-31T20:12:15+5:30
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरच्या विकासाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

आघाडी सरकारने केली नागपुरची उपेक्षा - मुख्यमंत्र्यांची टीका
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ३१ : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरच्या विकासाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. आघाडी शासनाच्या काळात नागपूर शहराला उपराजधानीचा दर्जा केवळ कागदावरच होता. नागपूरच्या विकासासंदर्भात अनेक प्रस्ताव वर्षानुवर्षे प्रलंबित पडलेले होते. काँग्रेस सरकारच्या काळात नागपूरची सातत्याने उपेक्षा होत गेली, अशी घाणाघाती टीका करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीवर हल्ला चढविला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खऱ्या अर्थाने हे शहर सरकारच्या अजेंड्यावर आणले आहे.
त्यामुळे गेल्या दोन वर्षात शहरात सर्वच क्षेत्रात झपाट्याने विकास होताना दिसत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितले. एवढेच नव्हे तर विकासाची ही गाडी अशीच सुसाट धावणार असून येत्या तीन वर्षांत नागपूर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी त्यांच्या स्वत:च्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात २०० कोटी रुपयांच्या विवि विकास कामांचे भूमिपूजन केले. दिव्यांगाना उपयोगी नि:शुल्क कृत्रिम अवयव व साहित्य वितरण ही करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना दिलेल्या सडेतोड उत्तराचीच चर्चा रंगली होती.
राज्यातील सर्व ग्रामपंचायती ह्यडिजीटलह्ण होणार
मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती फायबर आॅप्टिकने जोडून नागपूर जिल्हा डिजीटल केला आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत राज्यातील २९००० ग्रा.प. डिजीटल होणार आहे. ३५० सेवा आॅनलाईन करण्यात येणार आहे. त्या मोबाईल अॅपवर आणून लोकांची कामे सहज होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.