मुंबई पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे ‘एकला चलो रे’

By Admin | Updated: July 5, 2015 02:04 IST2015-07-05T02:04:13+5:302015-07-05T02:04:13+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवेल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शनिवारी केली.

NCP's 'Ekla Chalo Re' in Mumbai municipal elections | मुंबई पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे ‘एकला चलो रे’

मुंबई पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे ‘एकला चलो रे’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवेल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शनिवारी केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केल्यानंतर अहिर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार असताना मुंबईच्या पायाभूत सुविधांवर आम्ही भर दिला. मात्र जून महिन्यातील पहिल्याच पावसात या शहराची दैना उडाली. त्यास महापालिकेची कुचकामी नालेसफाई जबाबदार आहे, असे सांगून तटकरे यांनी पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीवर हल्ला केला. अहिर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पक्ष मजबूत होईल व मुंबईच्या समस्यांवर आंदोलन करील, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महापालिका निवडणुकीत आम्ही काँग्रेसशी आघाडी केल्यामुळे मुंबईत राष्ट्रवादीची व्होटबँक तयार झाली नाही. त्यामुळे स्वबळावर येती महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे अहिर यांनी सांगितले.
मैदाने नसल्याने उत्सव रस्त्यावर
मुंबई उच्च न्यायालयाने उत्सवांच्या काळात मंडप उभारणे व ध्वनिप्रदूषण याबाबत दिलेल्या आदेशाविरोधात राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल करणे गरजेचे आहे. उत्सव हे शहरे निर्माण होण्यापूर्वीपासून साजरे केले जात आहेत. उत्सव साजरे करण्याकरिता पुरेशी मैदाने नसल्याने नाइलाजाने रस्त्यांवर मंडप घालण्यास परवानगी द्यावी लागते. सरकारने याबाबत बैठक बोलावली असून त्यामध्ये आम्ही आमची भूमिका मांडू, असे सचिन अहिर म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)

तटकरेंचा काँग्रेसला टोला
वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करीत नसल्याबाबत सुनील तटकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, काही मंडळींकडून बोलल्यासारखे दाखवले जाते.
मात्र प्रत्यक्षात काही केले जात नाही. विधिमंडळ अधिवेशनात समन्वय साधून दोन्ही काँग्रेस दुबार पेरणीचे संकट, सावकारी कर्जमाफी वगैरे प्रश्नांवर सरकारला धारेवर धरणार आहे.

Web Title: NCP's 'Ekla Chalo Re' in Mumbai municipal elections