राष्ट्रवादीच देईल राज्याला दिशा
By Admin | Updated: August 18, 2014 03:58 IST2014-08-18T03:58:58+5:302014-08-18T03:58:58+5:30
खोटे बोलायचे आणि ते रेटून बोलायचे हा केवळ एकमेव धंदा सध्या विरोधकांचा आहे. अनेक लाटा येतील

राष्ट्रवादीच देईल राज्याला दिशा
महाड : खोटे बोलायचे आणि ते रेटून बोलायचे हा केवळ एकमेव धंदा सध्या विरोधकांचा आहे. अनेक लाटा येतील आणि जातील, पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला दिशा देण्याची धमक केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असल्याने येत्या विधानसभेतही पुन्हा राज्यात सत्तेवर येण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणगाव येथे आज झालेल्या निर्धार मेळाव्यात केला. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रायगडचे पालकमंत्री सचिन अहिर, आ. अनिल तटकरे, आ. सुरेश लाड, प्रदेश सरचिटणीस बाबाजी जाधव, सिद्धी विनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे आदी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील अपयशाने कार्यकर्त्यांनी नाउमेद होण्याची गरज नाही. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढावे तसेच आघाडी सरकारने घेतलेल्या महत्त्वाकांक्षी योजना व निर्णयांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण राज्यभरात निर्धार मेळाव्यांचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोकणाला कायम झुकते माप दिले आहे.
अर्थमंत्री म्हणून काम करताना सुनील तटकरे यांनीही कोकण विकासासाठी अनेक योजनांची घोषणा करून त्यांची आज प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत आहे. इतकी विकासकामे करूनही मतदार मते देत नसतील तर ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेल.
आघाडी सरकारने अन्य कुठल्या जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आदिवासी समाजाच्या आरक्षणालाही धक्का न लावता धनगर समाजालाही आरक्षण देण्याबाबतची शिफारस राज्य शासन करणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट करतानाच मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत राहिलेल्या काही त्रुटी दुरुस्त करण्याचे आश्वासनही पवार यांनी या वेळी दिले.
आघाडी शासनाने घेतलेल्या निर्णयाची व विविध योजनांची माहिती पवार यांनी या वेळी दिली. या योजनांबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जनजागृती करावी, असे आवाहन पवार यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना केले. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची तो निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील; पण या ठिकाणी दिलेल्या उमेदवारीवरून कोणीही नाराजी व्यक्त करून कृती केल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही पवार यांनी या वेळी दिला. (वार्ताहर)