"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:59 IST2025-09-23T13:58:37+5:302025-09-23T13:59:34+5:30
"...याचा अर्थ, निवडणूक आयोगासंदर्भातील अविश्वास वाढीला ते मदत करत आहेत आणि ही चांगली गोष्ट नाही."

"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
काँग्रेस खासदार तथा लोकसभेतील विरोदीपक्ष नेते राहुल गांधी, हे सातत्याने मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर "मतचोरीचा" आरोप करत आहेत. यातच आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केला आहे. "राहुल गांधी किंवा इतरांनी निवडणूक आयोगासंदर्भात टीका टिप्पणी केली, की भाजप नेते उत्तर देतात. याचा अर्थ, निवडणूक आयोगासंदर्भातील अविश्वास वाढीला ते मदत करत आहेत," असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांसोबत बोलत होते.
यावेळी, राहुल गांधी यांच्या निडवणूक आयोगावरील आरोपासंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, "राहुल गांधी आणि अन्य काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांचा रोख जो आहे, तो निवडणूक आयोगाच्या एकंदरित कामाच्या पद्धतीवर आहे. राहुल गांधी हे संसदेत विरोदीपक्ष नेते आहेत. विरोधी पक्ष हीसुद्धा एक इन्स्टिट्यूशन आहे. यामुळे ते जे सातत्याने मांडत आहेत, त्याची नोंद संबंधित संस्थेने घ्यायला हवी."
"...याचा अर्थ, निवडणूक आयोगासंदर्भातील अविश्वास वाढीला ते मदत करत आहेत"
पवार पुढे म्हणाले, "आज घडतेय काय? की राहुल गांधी किंवा इतरांनी निवडणूक आयोगासंदर्भात टीका टिप्पणी केली, की त्याचे उत्तर निवडणूक आयोग देत नाही. त्याचे उत्तर, आज भाजपचे नेते देत आहेत. हा विषय त्यांचा नाही, हा विषय निवडणूक आयोगाचा आहे. पण आयोग राहिलं बाजूला आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी हेच त्याची उत्तरं देत आहेत. याचा अर्थ, निवडणूक आयोगासंदर्भातील अविश्वास वाढीला ते मदत करत आहेत आणि ही चांगली गोष्ट नाही."