“हा रडीचा डाव, निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही”: सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 15:43 IST2024-08-19T15:42:29+5:302024-08-19T15:43:44+5:30
NCP SP Group MP Supriya Sule News: त्यांचे सरकार येणार नाही. आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेत आणखी सुधारणा करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

“हा रडीचा डाव, निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही”: सुप्रिया सुळे
NCP SP Group MP Supriya Sule News: आगामी विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात न होता डिसेंबर महिन्यापर्यंत लांबणीवर पडण्याचा अंदाज वर्तवविला जात आहे. महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याची चर्चा आहे. याबाबत आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीचे नेते यावरून टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांच्याशी कुठेही संवाद साधायला तयार आहे. त्यांनी वेळ द्यावी, त्यांनी चुकीचे आरोप केले आहेत. चुकीच्या घटना कुठे होत आहेत त्यांना माहिती नाही. लाडकी बहीण योजनेसाठी २०० कोटींची जाहिरात करत असाल तर त्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले पाहिजे. तेच पैसेया आशा वर्कर्सना आणि अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना दिले असते तर त्यांची दिवाळी गोड झाली असती, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही
कितीही निवडणुका पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही. हा रडीचा डाव आहे. लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नाही तर यातच त्यांचे अपयश आहे. पैसे वाटप करून निवडणूक जिंकता येत नाही. हे सरकार किती निर्णय संविधान चौकटीच्या बाहेर जाऊन घेतेय. सरकार आले नाही तर लाडकी बहीण योजना बंद होईल. जो उठतो आहे तो अशी धमकी देत आहे. एक तर त्यांचे सरकार येणार नाही आणि ही योजना बंद होणार नाही. कारण आमचे सरकार आल्यानंतर या योजनेत आम्ही आणखी सुधारणा आणणार आहोत. लाडकी बहीण योजना यांनी कधी आणली? लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आणली, लोकसभेच्या आधी बहीण लाडकी नव्हती, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, अजित पवारांना काळे झेंडे दाखवले तो त्यांच्या महायुतीतला अंतर्गत प्रश्न आहे. मला एका गोष्टीचे वाईट वाटते की, प्रत्येकाचा मान सन्मान केला पाहिजे. काळे झेंडे दाखवले गेल्याची घटना पाहून मला आश्चर्य वाटले. पण दुसऱ्याच्या घरात आपण कशाला पडायचे? तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.