शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्धव ठाकरेंनी फोनवरुन केली विचारपूस; म्हणाले, “आता ४ दिवस...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 19:02 IST2025-01-27T19:00:46+5:302025-01-27T19:02:41+5:30
Uddhav Thackeray Phone Call To Sharad Pawar: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळे यांनी माहिती देताना उद्धव ठाकरेंनी फोन केल्याचे सांगितले.

शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्धव ठाकरेंनी फोनवरुन केली विचारपूस; म्हणाले, “आता ४ दिवस...”
Uddhav Thackeray Phone Call To Sharad Pawar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती बिघडली आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील कार्यक्रमादरम्यान भाषणात त्यांना वारंवार खोकल्याचा त्रास होत असल्याचे दिसून आले होते. मात्र तरीही ते पुण्यातून कोल्हापूरच्या दौऱ्यावर गेले. तिथे नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर पवार यांची प्रकृती आणखीनच बिघडली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असून पवार सध्या मुंबईत आहेत. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळताच त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून विचारपूस केल्याचे सांगितले जात आहे. यातच आता उद्धव ठाकरे यांनीही शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
शरद पवार यांचे पुढील काही दिवसांतील सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार यांना खोकल्यामुळे बोलण्यात त्रास होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. खोकल्यामुळे बोलण्यात अडचण होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार चार दिवस सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट देताना उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता, असे सांगितले.
उद्धव ठाकरेंनी फोनवरुन केली शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस
सर्वांच्या शुभेच्छांमुळे आणि प्रेमामुळे शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारण होत आहे. शरद पवार यांना डॉक्टरांनी तीन ते चार दिवस आराम करायला सांगितला आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीकडे डॉक्टरांकडून बारकाईने लक्ष दिले जात आहे. शरद पवारांना घरी बसून राहणे फारसे आवडत नाही. मला उद्धव ठाकरे अनेकवेळा चिडवतात की, तुम्ही घरी त्यांना फारच त्रास देता म्हणून ते सारखे दौरे करतात. उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितले की, आता चार दिवस सक्तीने त्यांना घरातच ठेवा.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल शरद पवार यांना फोन करत त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. तसंच पूर्णपणे बरं वाटेपर्यंत विश्रांती घ्यावी, अशी विनंतीही अजित पवारांनी काकांना केल्याचे समजते.