NCP SP Group MP Amol Kolhe Replied Sanjay Raut: सरहदच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. अलीकडच्या काळात नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे. एकनाथ शिंदे यांनी केवळ महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावर नेण्याचे काम केले नाही, तर राजकारणाला योग्य दिशा देण्याचेही काम केले, अशा शब्दांत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शरद पवार यांच्यावर टीका केली. याला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले.
ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणे बसलेले आहेत. त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणे हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारे आहे, ही आमची भावना आहे. कदाचित शरद पवार यांची भावना वेगळी असेल. पण महाराष्ट्राच्या जनतेला हे पटले नाही. पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही तुमचा आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाह यांच्या सहकार्याने तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला. अशांना आपण सन्मानित केले, यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील. पवारसाहेब, आम्हाला तुमचे दिल्लील राजकारण जे काही आहे ते आम्हाला माहिती नाही, आम्हालाही राजकारण कळते. पण आम्हाला सर्वांना आणि महाराष्ट्राला या गोष्टीमुळे नक्कीच वेदना झालेल्या आहेत. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात, असे सांगत संजय राऊतांनी बोचरी टीका केली. यानंतर आता अमोल कोल्हे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.
राजकीय भूमिका न घेता स्टेटमनशिपचा आदर्श घालून दिला
संजय राऊत यांची एक भूमिका नक्कीच असू शकते. मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत आहे. शरद पवारांनी स्टेटमनशिपचे उदाहरण घालून दिले आहे. महाराष्ट्र त्यासाठी ओळखला जातो. संजय राऊतांचे वैयक्तिक मत काहीही असू शकते. पण या सत्कारात काही गैर आहे असे वाटत नाही. शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत त्यामुळे ते त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठिशी ते ठामपणे उभे आहेत. इथे राजकीय भूमिका न घेता स्टेटमनशिपचा आदर्श घालून दिला. संजय राऊत यांच्याकडे वेगळी माहिती असेल तर मला माहीत नाही, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, साहित्य संमेलनाच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. जे राज्याबाहेरचे मराठी लोक आहेत त्यांनाही या संमेलनामुळे आनंद झाला आहे. दिल्लीत साहित्य संमेलन होण्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही प्रयत्न केले. राजकारण आम्हाला कळते, असे संजय राऊत म्हणाले. पण, ते उगाचच तुऱ्याला आरसा दाखवण्यासारखे आहे. शरद पवारांच्या राजकारणावर बोलण्याची उंची फार कमी लोकांची आहे. शरद पवारांना किती राजकारण कळते, हे कुणी सांगण्याची आवश्यकता नाही. राऊत यांना इतके दुःख असेल तर त्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे की, उद्धव ठाकरेही अजित पवारांना भेटले होते. आपण याला स्टेटमनशिप म्हणून बघू, प्रत्येकवेळी राजकारण आणले तर अवघड होईल, या शब्दांत अमोल कोल्हे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.