मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शपथविधी घेऊन १० दिवस झाले तरी अद्याप खातेवाटप जाहीर झाले नाही. बिनखात्याचे मंत्री म्हणून राष्ट्रवादी मंत्र्यांवर विरोधकांकडून टीका होत होती. खातेवाटपाचा तिढा लवकर सुटावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या वारंवार बैठका होत होत्या. आता या बैठकीतून तोडगा निघाल्याची माहिती समोर आली आहे.
मंत्रिमंडळाचे खातेवाटप आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, अर्थखाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळणार आहे. तर सहकार मंत्रालयाची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सुपूर्द केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ही दोन महत्त्वाची खाती जाणार आहेत. सुरुवातीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपाकडे ही खाती होती. मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा समावेश झाल्याने ही खाती भाजपाकडून राष्ट्रवादीला देण्यात आली आहेत. अजित पवार यांना अर्थ खाते देऊ नये यासाठी शिवसेना आमदारांनी आग्रही मागणी केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाल्याने आता अर्थ खाते अजित पवारांना मिळणार हे स्पष्ट झाले आहे.
सहकार खाते छगन भुजबळ यांना दिले जाईल असं सांगितले जात होते. परंतु भुजबळांऐवजी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खाते देण्याचे ठरले आहे. सहकार क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेता केंद्रात हे खाते नव्याने निर्माण करण्यात आले. त्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे आहे. राज्यात पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सहकार खाते हे भाजपा मंत्री अतुल सावे यांच्याकडे होते. आता हे खाते राष्ट्रवादीकडे गेले आहे. त्याचसोबत अर्थ खाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. राज्याच्या तिजोरीची चावी या खात्याकडे असते तेदेखील राष्ट्रवादीला मिळाले आहे. त्यामुळे सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं महत्त्व अधोरेखित झाले आहे.
खातेवाटपावरून शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात मतभेद असल्याचं बोललं जात होते. अर्थमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यास शिवसेना आमदारांचा विरोध होता. परंतु अर्थखाते मिळावे असा अजित पवार गटाचा आग्रह होता. राज्यात याबाबत बैठका सुरू होत्या परंतु मार्ग निघत नसल्याने अखेर तोडगा काढण्यासाठी अजित पवार यांनी बुधवारी दिल्ली गाठली. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेलही दिल्लीत होते. या दोघांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यानंतर भाजपाकडील ही २ महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला देण्यात आली आहेत.