NCP Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बंद दाराआड केलेल्या चर्चेने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी या भेटीबाबत आपली भूमिका मांडत दोन नेते भेटले असतील तर त्यात गैर काही नसल्याचं म्हटलं आहे.
पत्रकारांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "जयंत पाटील यांच्याशी आमचीही चर्चा होत असते. ते आणि जितेंद्र आव्हाड विधिमंडळात आमच्या शेजारीच बसत असतात. त्यामुळे चर्चा होत असते. ते विरोधी पक्षात आहेत, आमचे राजकीय मतभेद आहेत, पण आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाही. त्यामुळे अजित पवार आणि जयंत पाटील यांची भेट झाली असेल तर त्यात गैर काही नाही," असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, "भाजपचे आमदार सव्वाशेच्या वर गेले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार किती आहेत? आम्हाला कुठून कुठे जायचं आहे, याचा विचार करून काम करायला हवं," असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांनी काय खुलासा केला?
जयंत पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण येताच अजित पवार यांनी काल स्पष्टीकरण दिलं. "कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) संबंधीच्या एका कमिटीत जयंत पाटील यांचा समावेश आहे. त्यांनी याबाबतच्या बैठकाही घेतल्या आहेत. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मी कृषी क्षेत्रातील एआयच्या वापराबाबत भाष्य करत ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. एआयचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. या पार्श्वभूमीवर एआयच्या संदर्भात जयंत पाटील यांचे काय म्हणणे आहे, काय सूचना आहेत, ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. पण आमच्या भेटीनंतर बाहेर वेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरल्या. मला त्यासंदर्भातील फोन आल्यानंतर मी सांगितले की त्यात कोणतेही तथ्य नाही," असा खुलासा अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला होता.