एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर एकनाथ खडसेंचे सूचक विधान; म्हणाले, “आम्ही आता...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 19:44 IST2022-06-22T19:43:26+5:302022-06-22T19:44:14+5:30
सद्यस्थितीत राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर एकनाथ खडसेंचे सूचक विधान; म्हणाले, “आम्ही आता...”
जळगाव: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर दुसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. उलटपक्षी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढत असून, शिवसेनेतील आणखी काही आमदार गुवाहाटीला गेल्याचे समजते. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळून विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी या सर्व राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे.
विधानपरिषद निवडणुकीतील विजयानंतर एकनाथ खडसे हे पहिल्यांदाच जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघात पोहोचले. मुक्ताईनगर येथील निवासस्थानी स्वागतासाठी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
आम्ही वेट अँड वॉचच्या या भूमिकेत
एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील राजकीय घडामोडींवर फारसे बोलणे टाळले. आम्ही वेट अँड वॉचच्या या भूमिकेत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. एकनाथ खडसे यांच्या विजयाचा जल्लोष म्हणून त्यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात जय्यत तयारी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. मात्र सद्यस्थितीतील राजकीय घडामोडींमुळे समर्थक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तब्बल तीन वर्षानंतर खडसेंना आमदारकी मिळाली आहे, त्याचा मोठा आनंद कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र सद्यस्थितीत राजकीय घडामोडींमुळे चिंतेचे वातावरण सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये पसरलेले आहे.