NCP AP Group Chhagan Bhujbal News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावेळी चांगलेच मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. तसेच अजित पवार यांच्यावर सडकून टीकाही केली. अशातच छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर परदेशात गेलेले छगन भुजबळ मायदेशात परतले.
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ४० मिनिटे चर्चा केली होती. मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यापासून ते त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार यांना मात्र भेटले नाहीत. भुजबळ यांच्यासोबत समीर भुजबळ हेदेखील होते. तीव्र नाराज असलेले भुजबळ यांनी ‘कसला दादा अन् कसला वादा’ असे टीकास्त्र सोडत अजित पवार यांना लक्ष्य केले होते. ‘जहाँ नही चैना, वहाँ नही रहना’ असे म्हणत अजित पवार गट सोडण्याचे संकेतदेखील दिले होते. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे. काही समर्थकांनीदेखील ‘भाजपसोबत चला’ असे विनंतीवजा आवाहन त्यांना केले होते. भाजपाच्या कोट्यातील एक मंत्रिपद शिल्लक आहे. मंत्रिपदासाठी छगन भुजबळ भाजपामध्ये प्रवेश करू शकतात, असा कयास राजकीय वर्तुळात बांधला जात आहे. यातच परदेशातून परतल्यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिपदाचा शब्द दिला आहे का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिपदाचा शब्द दिला आहे का? असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, देवेंद्र फडणवीस मला मंत्रिपदाबाबात काही बोलले नाहीत. फक्त ७ ते १० दिवस थांबा नंतर चर्चा करु एवढेच ते म्हणाले होते. मला मंत्री करणार किंवा आणखी काही जबाबदारी देणार असे काहीही बोललेले नाहीत. मी देखील तसे काही सांगितले नाही, असे भुजबळांनी स्पष्ट केले.
दरम्यान, छगन भुजबळ अद्यापही नाराज असून, परदेशात असताना मनधरणी करण्यासाठी तुम्हाला कोणाचे फोन आले होते का? असा प्रश्न भुजबळ यांना विचारला. यावर बोलताना, मला कोणाचेही फोन आले नाहीत आणि आले तरी मी तुम्हाला सांगणार नाही. मात्र, मी पूर्णपणे थोडे दिवस राजकारणातून बाजूला होतो. आयुष्यभर राजकारण करतच आहे. त्यामुळे थोड्यावेळ डोक्याला राजकीय आराम द्यावा लागतो, असे भुजबळ म्हणाले.