Chhagan Bhujbal News: विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर असा लौकिक असलेल्या पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षाच्या तरुणीवर एका नराधमाने अमानुष अत्याचार केला. मंगळवारी पहाटे घडलेल्या या पाशवी घटनेने लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याने पुणे हादरले असून, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावरून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तर महायुतीतील नेतेही यावर प्रतिक्रिया देत आहेत.
पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी पुण्यातील घटनेवर भाष्य केले. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. ते आरोपीला शोधून काढतील आणि अटक करतील. सरकारही या सगळ्या गोष्टींमध्ये काळजीपूर्वक आदेश देत आहे. मात्र पुणे बलात्काराची घटना लांछनास्पद आहे. कसे झाले? काय झाले? याची चौकशी सुरु आहे. इतर अनेक गोष्टी त्या ठिकाणी सापडल्या आहेत. याआधीही असे काही घडले आहे का? जर होत असेल तर लोक गप्प कसे बसले? पोलीस गप्प बसले? याची चौकशी झाली पाहिजे ही सगळ्यांचीच मागणी आहे, असे भुजबळ म्हणाले.
पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निर्णय घेतील
महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदावरून धुसपूस सुरू आहे. यातच नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपाकडे राहणार असल्याबाबत दिल्लीतील नेतृत्वाने निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे. तर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. मला याबाबत काही कल्पना नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करून प्रश्न सोडवतील. नाशिकमध्ये भाजपाचे ५ आमदार आहेत, त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री चर्चा करून मार्ग काढतील, असे भुजबळ म्हणाले.
दरम्यान, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून, त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.