जहाल नक्षलवाद्याला वर्धेत अटक
By Admin | Updated: June 14, 2015 01:54 IST2015-06-14T01:54:20+5:302015-06-14T01:54:20+5:30
छत्तीसगढ येथील नक्षलवाद्यांच्या बायनार दलमचा कमांडर रसुल उर्फ अनिल शोरी या जहाल नक्षलवाद्याला वर्धा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

जहाल नक्षलवाद्याला वर्धेत अटक
वर्धा : छत्तीसगढ येथील नक्षलवाद्यांच्या बायनार दलमचा कमांडर रसुल उर्फ अनिल शोरी या जहाल नक्षलवाद्याला वर्धा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. नाव बदलून तो सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार घेत होता. त्याच्यावर छत्तीसगढ येथील कोंडा व नारायणपूरसह गडचिरोली जिल्ह्यात ५०च्या वर गुन्हे दाखल आहेत. छत्तीसगढ शासनाने त्याच्या शिरावर ५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.
रसुलला सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरिता आणणाऱ्या राजू व महेश नामक दोन युवकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघे भामरागढ येथील असून, त्यांचा नक्षल चळवळीशी संबंध आहे अथवा नाही, याचा खुलासा झाला नाही. या तिघांनाही शनिवारी गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. रसूल हा ‘शंकर मिच्ची’ या नावाने ३१ मे रोजी सेवाग्राम येथील रुग्णालयात ‘हर्निया’च्या उपचारार्र्थ आला होता. (प्रतिनिधी)