समीर वानखेडे वसुलीत सामील, नवाब मलिकांचा दावा; देवेंद्र फडणवीसांवरही केले आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 00:34 IST2021-11-04T00:33:11+5:302021-11-04T00:34:24+5:30
"मी साधारणपणे ४५ वर्षांपासून राजकारणात आहे. मी कधीही राजकीय आघाडी उघडली नाही. पण मी आता अन्यायाविरुद्ध आघाडी उघडली आहे. निर्दोष लोकांना अडकवले जात आहे. मोठ्या प्रमाणावर वसुली होत आहे."

समीर वानखेडे वसुलीत सामील, नवाब मलिकांचा दावा; देवेंद्र फडणवीसांवरही केले आरोप
मुंबई - महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांचे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरील हल्ले अद्यापही सुरूच आहे. मलिक सातत्याने वानखेडे यांच्यावर वसुलीचे आरोप करत आहेत. नवाब मलिक म्हणाले, मी साधारणपणे ४५ वर्षांपासून राजकारणात आहे. मी कधीही राजकीय आघाडी उघडली नाही. पण मी आता अन्यायाविरुद्ध आघाडी उघडली आहे. निर्दोष लोकांना अडकवले जात आहे. मोठ्या प्रमाणावर वसुली होत आहे. मी विभागा (NCB) विरोधात नाही, तर जे चुकीचे काम करत आहेत त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. लोकप्रियतेसाठी चित्रपटांत काम करणाऱ्यांना टार्गेट केले जात आहे, असा दावाही मलिक यांनी केला आहे.
कुणीही ड्रग्ज घेत नाही, असे मी म्हणत नाही पण...
"कुणीही ड्रग्ज घेत नाही, असे मी म्हणत नाही. पण, जे ड्रग्स घेतात, त्यांची शंका असेल तर त्यांचे रक्त, लघवीचे नमुने घ्या. चाचणीत पॉझिटिव्ह आल्यास कोर्टात उभे करा. अशा लोकांना जामीन मिळतो. त्यात एक वर्षाची शिक्षा आहे. त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवले जाते. वानखेडे यांना विभागात आणले गेले तेव्हा सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण होते. त्यावरून बरेच राजकारण झाले. त्यावेळी दीपिका पदुकोण, सारा अली खान यांना लक्ष्य करण्यात आले. फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी," असेही मलिक म्हणाले. ते एबीपी न्यूजसोबत बोलत होते.
देवेंद्र फडणवीसांवरही आरोप -
नवाब मलिक म्हणाले, नीरज गुंडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जवळचा आहे. देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रीय यंत्रणांमध्ये हस्तक्षेप आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच येथे अधिकारी आणले जातात. हे मी जबाबदारीने बोलत आहे. नीरज गुंडे सर्व कार्यालयांत बसलेला असतो.
जावयाच्या अटकेसंदर्भात काय म्हणाले मलिक -
ड्रग्ज प्रकरणात आपल्या जावयाच्या अटकेसंदर्भात बोलताना नवाब मलिक म्हणाले, ते जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा साडे आठ महिने आम्ही काहीही बोललो नाही. जेव्हा फॉरेन्सिक अहवाल आला, तेव्हा त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे ड्रग्स नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर, त्यांना जामीन मिळाला. मात्र, जेव्हा मी यावर बोलायला सुरुवात केली, तेव्हा काही पत्रकारांनी सांगितले, की समीर वानखेडे तुमच्यावर नाराज आहे. मला त्यांच्याबद्दल सर्व काही माहित आहे, असेही मलिक म्हणाले.
नवाब मलिक म्हणाले, वसुली केलेल्या पैशांतून समीर वानखेडे महागडे कपडे परिधान करतात. त्यांचे उत्पन्न किती आहे? एक अधिकारी दररोज दोन लाख रुपयांचे बूट कसे घालतो आणि 75 हजारांचा शर्ट कसा घालू शकतो. आम्ही एका दिवसात कोणतीही माहिती गोळा केलेली नाही. त्यांनी डीआरआय आणि कस्टममध्ये काम केले आहे. ते भ्रष्ट आहेत, असा आरोपही मलिक यांनी केला आहे.