Maharashtra Politics: “आता भाईजान उद्धव ठाकरे म्हणा”; मविआच्या वज्रमूठ सभेवर नवनीत राणांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 10:41 IST2023-04-03T10:40:30+5:302023-04-03T10:41:33+5:30
Maharashtra News: ज्यांनी फेसबुकच्या माध्यमातून सरकार चालवले ते काय पंतप्रधान मोदींवर टीका करणार, असा टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे.

Maharashtra Politics: “आता भाईजान उद्धव ठाकरे म्हणा”; मविआच्या वज्रमूठ सभेवर नवनीत राणांची घणाघाती टीका
Maharashtra Politics: महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप, केंद्रातील मोदी सरकार आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र या जाहीर सभेला उपस्थित नव्हते. आता यावरून राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे. यातच आता या सभेनंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता भाईजान उद्धव ठाकरे असे संबोधले पाहिजे. ३३ महिने मुख्यमंत्री असताना औरंगाबादचे नाव ते संभाजीनगर करू शकले नाही. ३३ महिन्याच्या सरकारमध्ये अमरावती दंगा झाला, तेव्हा का वेदना झाल्या नाहीत, अशी विचारणा करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही. ज्यांनी फेसबुकच्या माध्यमातून सरकार चालवली ते काय पंतप्रधानांवर टीका करणार. पंतप्रधानांवर टीका करणे योग्य नाही, त्याला उत्तर देण्यासाठी देशाची आणि महाराष्ट्राचे लोक सक्षम आहेत, अशी घणाघाती टीका नवनीत राणा यांनी केली.
बाबा पुन्हा आतमध्ये तर टाकणार तर नाही ना...
हनुमान जयंतीनिमित्त अमरावतीत नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याच्या पुढाकारातून सामुहिक हनुमान चालिसा पठणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मागील हनुमान जयंतीची आठवण नवनीत राणा यांनी सांगितली. हनुमान चालीसा वाचायचे म्हटल्यावर डोक्यात विचार येतो की, बाबा पुन्हा आतमध्ये तर टाकणार तर नाही ना, अशी खोचक टिप्पणी राणा यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना नवनीत राणा म्हणाल्या की, जे लोक लोकांमधून निवडून आले नाही, त्यांना लोकांची भावना कळत नाही. लोकांसाठी मेहनत केले नाही अशा लोकांवर मी काय बोलणार. मी संघर्ष करून इथपर्यंत पोहचली आहे. त्या लोकांवर बोलण्यात मला इंटरेस्ट नाही, असा पलटवार नवनीत राणा यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"