ठाण्यातून होणार जलवाहतूक
By Admin | Updated: May 30, 2016 02:32 IST2016-05-30T02:32:06+5:302016-05-30T02:32:06+5:30
मागील कित्येक वर्षे कागदावरच असलेल्या जलवाहतूक प्रकल्पाच्या कामाचा नारळ अखेर बुधवारी फुटला

ठाण्यातून होणार जलवाहतूक
ठाणे : ठाणे महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी ठरलेल्या आणि मागील कित्येक वर्षे कागदावरच असलेल्या जलवाहतूक प्रकल्पाच्या कामाचा नारळ अखेर बुधवारी फुटला. अवघ्या वर्षभरात हे काम मार्गी लागणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. सध्या मुंबई आणि नवी मुंबईला या जलवाहतुकीतून वगळले असले तरी ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांना ती जोडली जाणार आहे. मालवाहू, प्रवासी आणि पर्यटन अशा तिन्ही स्तरांवर ती सुरू होणार असल्याने रेल्वे आणि रस्त्यांवरील सार्वजनिक वाहतुकीवरील प्रवाशांचा ताण होणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.
जलवाहतुकीसंदर्भात महापालिकेने अर्थसंकल्पातही तरतूद केली होती. तसेच मागील महिन्यांत ती कशी असेल, याविषयीची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली होती. शिवाय, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनीदेखील या प्रकल्पाला चालना देण्याचे संकेत दिले होते. वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचाच एक भाग असलेल्या या जलवाहतुकीच्या कामाला आता वेग आला असून गायमुख येथे यासाठी जेट्टी बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सुरु वातीला मुंबई आणि नवी मुंबईपर्यंत ती सुरू करण्याचा पालिकेचा विचार होता. मात्र, या ठिकाणी वाहतूक सुरू करण्यासाठी त्या ठिकाणीदेखील जेट्टी बांधण्याची आवश्यकता असल्याने तूर्तास या दोन शहरांना वगळले आहे. त्यामुळे ठाण्यापासून कल्याण, वसई, मीरा-भार्इंदर, भिवंडी या शहरांपर्यंत जलवाहतूक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे उपनगर अभियंता अनिल पाटील यांनी
दिली.
जलवाहतुकीसाठी केंद्र सरकारकडे सहा महिन्यांपूर्वीच प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावामध्ये केंद्र सरकारने अशा प्रकारच्या जलवाहतुकीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, गायमुख येथे जेट्टी उभारण्यासाठी ठाणे महापालिकेने ११ कोटी मेरीटाइम बोर्डाकडे वर्ग केले असून मेरीटाइम बोर्डाच्या वतीनेच गायमुख जेट्टीचा विकास केला जाणार आहे. (प्रतिनिधी)
मालवाहू, प्रवासी आणि पर्यटन
मालवाहू जलवाहतूक, प्रवासी आणि पर्यटन अशा तीन स्तरांवर जलवाहतूक सुरू होणार असल्याने पालिकेलादेखील यापासून चांगला महसूल मिळणार आहे. प्रवासी जलवाहतुकीमुळे रस्ते आणि रेल्वेवरील भार कमी होणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील ठाण्यात जलवाहतुकीचा विकास करण्यात येणार असल्याने पर्यटकांनादेखील ठाण्यात सागरीमार्गे येण्यास वाव मिळणार आहे.
रस्त्यांवरील ट्रॅफिक होणार शिफ्ट
या वाहतुकीमुळे शहरात रस्त्यांवर होणारी ट्रॅफिक यामुळे कमी होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. सध्या ठाण्यातील मुख्य चौक हे वाहनांमुळे गजबजले आहेत. त्यामुळे या वाहनांना किंबहुना खाजगी वाहनचालकांना जलवाहतुकीचा पर्याय दिल्यास अंतर्गत भागांत रस्त्यांवर होणारी वाहतूक कमी होऊन ठाणेकरांना जलवाहतुकीचा एक उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहे. रेल्वे प्रवाशांचादेखील मोठा भार यामुळे कमी
होणार आहे.
पालिकेच्या उत्पन्नात
मोठी भर पडणार...रस्ते वाहतुकीच्या तुलनेत जलवाहतूक ५० टक्के स्वस्त असल्याने ठाण्यातून एकदा जलवाहतुकीला सुरुवात झाल्यानंतर माल वाहण्यासाठीही तिचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नातदेखील मोठी भर पडणार आहे.
१३ ठिकाणी
उभारली जाणार
जेट्टी
जलवाहतुकीचे जाळे पसरवण्यासाठी ठाण्यात १३ ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहेत. यामध्ये वाघबीळ, मुंब्रा, कळवा, कासारवडवली, ओवळा आणि ज्या ठिकाणी खाडीकिनारे आहेत, अशा ठिकाणी उभारण्यात येणार आहे.