रायगड समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट कांदेरी किल्ल्याजवळ बुडल्याची दुर्घटना घडली. या बोटीवरील आठ खलाशांपैकी पाच जणांनी तब्बल नऊ तास पोहत अलिबागमधील सासवणे समुद्रकिनारा गाठून आपला जीव गाठला. तर, उर्वरित तीन खलाशी अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील करंजा येथील मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीची तुळजाई ही बोट सकाळी सात वाजता मासेमारीसाठी समुद्रात गेली. मात्र, सुमारे साडेआठच्या सुमारास खांदेरी किल्ल्याजवळ समुद्रात जोरदार लाटा उसळल्या. या लाटांच्या तीव्र धक्क्यामुळे बोट डगमगली आणि काही क्षणांतच उलटून समुद्रात बुडाली.
३ जण अजूनही बेपत्ताहेमंत बळीराम गावंड (वय, ४५), संदीप तुकाराम कोळी (वय, ३८), रोशन भगवान कोळी ( वय, ३९), शंकर हिरा भोईर (वय, ६४) आणि कृष्णा राम भोईर ( वय, ५५) यांनी पोहत समुद्रकिनारा गाठला. तर, नरेश राम शेलार, धीरज कोळी, मुकेश यशवंत पाटील हे खलाशी अजूनही बेपत्ता आहेत. या घटनेची माहिती मिळताच मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सध्या या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. तटरक्षक दल, स्थानिक मच्छीमार आणि आपत्ती व्यवस्थापन पथके बेपत्ता खलाशांचा शोध घेत आहेत.
पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरूहेमंत, संदीप, रोशन, शंकर आणि कृष्णा यांना तत्काळ अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे समुद्र किनाऱ्यावरील परिसरात खळबळ उडाली आहे.