बेळगावमध्ये आजपासून नाट्यसंमेलन
By Admin | Updated: February 6, 2015 00:55 IST2015-02-06T00:52:41+5:302015-02-06T00:55:11+5:30
भव्य शामियाना : देवेंद्र फडणवीस, शरद पवार उपस्थित राहणार

बेळगावमध्ये आजपासून नाट्यसंमेलन
बेळगाव : बेळगावनगरीत शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून, ५० वर्षांनंतर होत असलेल्या नाट्य संमेलनाविषयी बेळगावकरांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. सी.पी.एड्. मैदानावर भव्य व आकर्षक शामियाना उभारण्यात आला आहे. शनिवारी (दि. ७) नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत. बेळगावमध्ये १९५६ मध्ये महाराष्ट्र राज्य संमेलन झाले होते. बेळगावमध्ये काही वर्षांपूर्वी नाटकांचे नेहमी प्रयोग होत होते. मराठीद्वेष्ट्या कर्नाटक सरकारने नाटक कंपन्यांच्या वाहनांवर प्रवेशकर लादून नाटकाचे प्रयोग करणे आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही, अशी व्यवस्था केली. नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रमांची मेजवानी मराठी भाषिकांना मिळाली आहे. शामियान्याची आसन क्षमता दहा हजार आहे. नाट्यसंमेलन स्थळाला ‘बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी’, असे नाव दिले असून, मुख्य मंचाला ‘स्मिता तळवलकर रंगमंच’ असे नाव दिले आहे. शामियान्यात वातानुकूलित रंगमंच उभारण्यात येत आहे. नाट्य संमेलनातील काही कार्यक्रम जिरगे सभागृह, लोकमान्य रंगमंदिर येथे होणार असून, त्यांना कुलदीप पवार, सदाशिव अमरापूरकर, नयनतारा, अशी नावे दिली आहेत. शुक्रवारी सायंकाळी ४.३० ते रात्री ८.३० यावेळेत गानरंग, भारूड, नृत्यरंग, गीतरामायण आणि प्रख्यात गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
वंदना गुप्ते यांना जीवन गौरव पुरस्कार
नाट्य संमेलनाच्या निमित्ताने गोगटे फौंडेशन तर्फे दरवर्षी निवडण्यात येणाऱ्या नाटकाला वा कलाकाराला जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदाचा जीवन गौरव पुरस्कार नाट्यक्षेत्रात ४४ वर्षे कार्यरत असणाऱ्या वंदना गुप्ते यांना नाट्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी (दि. ७) खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षांसाठी गुप्ते यांच्या अध्यक्षतेखाली ३ ते ४ सदस्यीय निवड समिती नेमण्यात येईल. समितीच्या अहवालानुसार गोगटे फौंडेशन पुढील वर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करेल.