गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले
By Admin | Updated: September 9, 2014 05:07 IST2014-09-09T05:07:27+5:302014-09-09T05:07:27+5:30
सामाजिक एकोपा वाढविण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या गणेशोत्सवाचे स्वरुप यावेळी मोठय़ा प्रमाणात बदलल्याचे चित्र पश्चिम वर्हाडात दिसून आले

गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले
संतोष मुंढे, वाशिम - सामाजिक एकोपा वाढविण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या गणेशोत्सवाचे स्वरुप यावेळी मोठय़ा प्रमाणात बदलल्याचे चित्र पश्चिम वर्हाडात दिसून आले. गत १0 दिवसांमध्ये या भागातील तिन्ही जिल्ह्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवून, गणेशोत्सव अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला.
लोकमान्य टिळकांनी जनजागृती, प्रबोधन करणे, तसेच सामाजिक एकोपा वाढून स्वातंत्र्यलढय़ाची चळवळ घराघरांत पोहोचविण्याच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना अस्तित्वात आणली. कालांतराने या उत्सवाचे स्वरूप बदलत गेले. सार्वजनिक गणेश मंडळं सामाजिक उपक्रमांबरोबरच धार्मिक कार्यक्रमांवर भर देऊ लागले. यावेळीही मंडळांनी तीच परंपरा जोपासली. रक्तदान, नेत्रतपासणी शिबिर आदी आरोग्यविषयक उपक्रमांसह काही ठिकाणी समाजातील कुप्रथा, समस्यांबाबत जनजागृती करण्याचे प्रयत्न गणेश मंडळांनी केले. एड्स आणि स्त्रीभ्रूण हत्येबाबत जनजागृती करण्यात आली. तद्वतच, प्रवचन, कीर्तन, सामूहिक गाथा पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही गणेश मंडळांच्या वतीने करण्यात आले.
वाशिम शहरातील एकूण गणेश मंडळांपैकी ७५ टक्के गणेश मंडळांच्यावतीने सामाजिक, धार्मिक उपक्रम राबविण्यात पुढाकार घेण्यात आला. ५ टक्के गणेश मंडळांनी मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन केले, तर २५ टक्के गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेश स्थापना केली. गणेश मंडळांनी अवाजवी खर्चाला यावेळी फाटा दिल्याचे चित्रही दिसून आले. बुलडाणा जिल्ह्यातील एकूण ८८१ सार्वजनीक गणेश मंडळांपैकी ८२ टक्के गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबविण्यास प्राधान्य दिले. शिक्षण, पर्यावरण संवर्धन, रक्तदान आणि गरजवंतांना मदत करण्यासह, वैद्यकीय शिबिराच्या माध्यमातून रुग्णसेवेवर भर देण्याचे काम या जिल्ह्यातील मंडळांनी केले. गतीमंद बालकांचे शैक्षणीक पालकत्व स्विकारून बुलडाण्यातील रुद्र गणेश मंडळाने पश्चिम वर्हाडातील सर्व मंडळांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.
अकोला जिल्ह्यातील एकूण १७८४ गणेश मंडळांनी विविध मुद्यांवर फलकं व देखावे सादर करुन जनप्रबोधनाचे काम केले. पश्चिम वर्हाडात सर्वाधिक ३२४ गावांमध्ये एक गाव एक गणपती बसविण्याचा विक्रम अकोला जिल्ह्याने आपल्या नावे केला आहे. १३ तालुक्याच्या बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी ८८१ सार्वजनीक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली. या जिल्ह्यातील २९२ गावात एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली. ६ तालुक्यांच्या वाशिम जिल्ह्यात ६0५ सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी झाली होती. यामध्ये शहरी भागातील २१९ तर ग्रामीण भागातील ३८६ गणेश मंडळांचा समावेश होता. ७ तालुक्याच्या अकोला जिल्ह्यात १७८४ सार्वजनीक गणेश मंडळानी श्रींची स्थापना केल्याची नोंद आहे. यामध्ये ३२४ गावात एक गाव एक गणपतीची नोंद करण्यात आली. १0 दिवसांच्या या उत्सवात तिन्ही जिल्ह्यांमध्ये कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नाही. गुण्यागोविंदाने एवढा मोठा उत्सव साजरा करून, पश्चिम वर्हाडाने सामाजिक एकोप्याचा संदेश दिला आहे.