नाशकात परप्रांतिय युवकाचा गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 17:02 IST2017-12-19T16:50:56+5:302017-12-19T17:02:13+5:30
नाशिक : गाडीचा हॉर्न का वाजवितो असे विचारल्याच्या रागातून एका परप्रांतिय युवकाने गावठी कट्टयातून गोळीबार केल्याची घटना मंगळवारी दुपारी सातपूर परिसरातील श्रमिकनगरमध्ये घडली़ या प्रकरणी सातपूर पोलिसांनी संशयित नंदन जयस्वाल (रा़श्रमिकनगर, सातपूर, मूळ राहणार आझमगढ, उत्तर प्रदेश) विरोधात गुन्हा दाखल केला असून गावठी कट्टाही जप्त करण्यात आला आहे़

संशयित नंदन जयस्वाल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास श्रमिकनगरमधील सात माऊली चौकात संशयित नंदन जयस्वाल याने गाडीचा हॉर्न वाजविला़ या हॉर्नमुळे त्रस्त झालेल्या वाल्मिकी नामक व्यक्तीने जयस्वाल यास हॉर्न वाजवू नको तसेच कायम गाडीचा हॉर्न वाजवून त्रास का देतो अशी विचारणा केली़ याचा राग येऊन जयस्वाल हा घरात गेला व घरातील गावठी कट्टा बाहेर आणत हवेत गोळीबार केला व फरार झाला़ या घटनेची माहिती नागरिकांनी पोलीसांना देताच पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांच्यासह सातपूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी सात माऊली चौकात पोहोचले होते़
सातपूर पोलिसांनी संशयित जयस्वालच्या घरातून गावठी कट्टा जप्त केला असून फरार झालेल्या जयस्वालच्या शोधासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे़ वाल्मिकी व नंदन यांच्यात पुर्वीपासून काही वाद आहेत का याचा शोध संशयिताचे वडील व नातेवाईकांकडून घेण्याचे काम सुरू होते़ दरम्यान, या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात संशयित जयस्वालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
कट्टयाबाबत माहिती घेण्याचे काम सुरू
संशयित नंदन जयस्वाल हा मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील रहिवासी आहे़ त्याचे कायम मूळ गावी जाणे-येणे असल्याने त्याने तेथून हा गावठी कट्टा आणला असावा असा प्राथमिक अंदाज आहे़ संशयित सापडल्यानंतर त्याने हा गावठी कट्टा नेमका कोठून व केव्हा आणला याबाबत माहिती मिळणार आहे़
- श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस उप आयुक्त, नाशिक़