नासा पेटंटचा मान जळगावकराला
By Admin | Updated: March 30, 2015 09:15 IST2015-03-30T09:15:14+5:302015-03-30T09:15:24+5:30
सध्या अमेरिकेत संगणक अभियंता असलेल्या पंकज पाटील यांनी तयार केलेल्या ‘नॅनो सेन्सर’ला जगविख्यात ‘नासा’ संस्थेने पेटंट दिले आहे.

नासा पेटंटचा मान जळगावकराला
विलास बारी, जळगाव
मूळचे जळगावचे व सध्या अमेरिकेत संगणक अभियंता असलेल्या पंकज पाटील (तोंडापूर ता. जामनेर) यांनी तयार केलेल्या ‘नॅनो सेन्सर’ला जगविख्यात ‘नासा’ संस्थेने (द नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन) पेटंट दिले आहे. पंकज यांनी तयार केलेला ‘नॅनो सेन्सर’चा अंतराळयानासाठी उपयुक्त ठरणार आहे. पंकज यांच्या संशोधनावर ‘नासा’ने शिक्कामोर्तब केल्याने मराठी तरुण अभियंत्याने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झेंडा रोवला आहे.
सुरुवातीला जामनेर येथे शिक्षण घेतल्यानंतर पंकज यांनी प्रवरानगर (अहमगनगर) येथे संगणक अभियंत्याची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत उच्चशिक्षण घेऊन तेथेच संशोधन सुरू केले. अंतराळयानाने उड्डाण केल्यानंतर वातावरणाचा ६ मैल प्रति सेकंद दाब तयार होतो. त्यामुळे यानाच्या खिडकीभोवती असलेले अतिसूक्ष्म धूलिकण बंदुकीच्या गोळीसारखे काचेवर आदळतात. अंतराळ यानाच्या सुरक्षेच्यादृष्टीने असलेला हा धोका लक्षात घेऊन पंकज यांनी ‘नॅनो सेन्सर’ विकसित केला आहे.
बारीक कॉईल्सचा वापर करून पंकज यांनी सेन्सर तयार केला आहे. यानाच्या खिडकीच्या दोन्ही बाजूला एकमेकांच्या विरूद्ध दिशेला या कॉईल्स असतात. त्यातून विद्युत प्रवाह प्रवाहित केल्यास त्याचे रूपांतर चुंबकीय प्रवाहात होते. तिसरी कॉईल्स त्याच्या जवळ आल्यास ठराविक संकेत मिळतात. सभोवताली तयार झालेले चुंबकत्व व संकेतावरून घटनांची अचूक माहिती मिळते.
> संशोधक कॅपिरो, पंकज व त्यांच्या तंत्रज्ञांच्या पथकाने विविध क्षेत्रांत ‘लो हॅग्रिंग फ्रूट’ हा सेन्सर तयार केला आहे. त्याचा वापर थ्री-डी प्रिंटर्स, लेझर होल्डर्स आणि बीम स्टिरिंग मीटर्स, मिलिट्री तंत्रज्ञान, रोबोटिक्स यात वापर होणार आहे.
> सध्या या सेन्सरची किंमत सुमारे एक लाख २० हजार आहे. पंकज यांच्या संशोधनामुळे आता हा सेन्सर ३० हजारांत उपलब्ध होईल.