कुजबुज: नरेश म्हस्के यांची नवी शक्कल; विरोधकांच्या टीकेचा एवढा मोठा धसका?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 10:25 AM2024-02-12T10:25:45+5:302024-02-12T10:26:18+5:30

आपल्यावर भविष्यात पडणारा कामाचा लोड कमी करण्याची ही नवी शक्कल लढवल्याची कुजबुज आहे.

Naresh Mhaske stopped those who were taking photos and videos while wishing CM Eknath Shinde | कुजबुज: नरेश म्हस्के यांची नवी शक्कल; विरोधकांच्या टीकेचा एवढा मोठा धसका?

कुजबुज: नरेश म्हस्के यांची नवी शक्कल; विरोधकांच्या टीकेचा एवढा मोठा धसका?

नरेश म्हस्के यांची नवी शक्कल

सध्या राज्यात एखादा गोळीबार, खुनखराब्याची घटना घडली तर त्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जाते. काही वादग्रस्त व्यक्तींचे त्यांच्यासोबतचे फोटो व्हायरल केले जातात. त्यानंतर त्याचा खुलासा प्रवक्त्यांना करावा लागतो. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आनंद आश्रम येथे कार्यक्रम घेण्यात आला होता. शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी दूरवरून कार्यकर्ते, पदाधिकारी आले होते. त्यांच्याकडून शुभेच्छा घेण्यास शिंदे यांनी सुरुवात केली. लागलीच समोरून मोबाइल कॅमेरे सुरू झाले, कोणी फोटो काढत होता, तर कोणी व्हिडीओ काढत होता. परंतु तेवढ्यात प्रवक्ते नरेश म्हस्के धावत आले व त्यांनी कोणीही फोटो, व्हिडीओ काढू नका, असे आदेश दिले. म्हस्के यांनी आपल्यावर भविष्यात पडणारा कामाचा लोड कमी करण्याची ही नवी शक्कल लढवल्याची कुजबुज आहे.

प्रफुलभाईंचा मोके पे चौका

राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यापासून अजित पवार हे शरद पवार यांच्या वाढत्या वयाविषयी व निवृत्तीविषयी काहीना काही शेरेबाजी करत असतात.  पण संधी मिळताच त्याची परतफेड करणे राजकारण्यांना उत्तम जमते. त्याचे असे झाले - रविवारी राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी हैदराबाद येथे आयोजित नॅशनल मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदके मिळविणाऱ्या हरयाणाचा १०७ वर्षीय रामबाई यांच्याविषयी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर एक ट्विट करताना - ध्येयासक्ती समोर असते तेव्हा वय हा केवळ एक आकडा असतो, अशा शब्दांत कौतुक केले. त्यावर खा. सुप्रिया सुळे यांनी, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे, वय हा केवळ आकडा आहे, अशी मार्मिक टिप्पणी केली. ही टिप्पणी अर्थातच ज्येष्ठ पवार यांच्या वयाविषयी केलेल्या जाणाऱ्या शेरेबाजीला धरून होती हे सांगणे न लगे!

प्रशासनाकडून टाेलवाटाेलवी

आमदार संजय केळकर यांनी अलिकडेच त्यांनी अतिक्रमण राेखण्याच्या दृष्टीने कंटेनरच्या शाखा हलवण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला. पण त्याला  प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे केळकर नाराज आहेत. १२ काेटी खर्चून काेपरीत क्रीडासंकुल बांधले. पण त्यातील कामात अनियमितता हाेऊन भ्रष्टाचार झाल्याच्या मुद्यावर ते वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहेत.  जिल्हाधिकाऱ्यांनी चाैकशी करून त्यात अनियमितता झाल्याचे स्पष्ट केले, पण संबंधितावर काेणतीच कारवाई केली नाही. क्रीडासंकुल सुरू करण्याची मागणी सहा महिन्यांपूर्वीच केळकरांनी केली हाेती, पण त्याकडे दुर्लक्ष करून तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन केले. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी टाेलवाटाेलवी करीत केळकरांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याची ठाणेकरांमध्ये कुजबुज आहे.

Web Title: Naresh Mhaske stopped those who were taking photos and videos while wishing CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.