गुन्ह्यांच्या तपासासाठी ‘नॅनो टेक्नॉलॉजी’!
By Admin | Updated: February 6, 2015 01:01 IST2015-02-06T01:01:48+5:302015-02-06T01:01:48+5:30
अनेकदा गुन्हा घडल्यानंतर सबळ पुरावे नसल्याच्या कारणांमुळे शोधकार्यात अडथळे येतात. परंतु गुन्ह्यांच्या तपासासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला तर अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करणे सोपे होऊ शकते.

गुन्ह्यांच्या तपासासाठी ‘नॅनो टेक्नॉलॉजी’!
पोलीस विभागासाठी ठरू शकते फायदेशीर : सूक्ष्म पुरावे गोळा करण्यासाठी उपयुक्त
योगेश पांडे - नागपूर
अनेकदा गुन्हा घडल्यानंतर सबळ पुरावे नसल्याच्या कारणांमुळे शोधकार्यात अडथळे येतात. परंतु गुन्ह्यांच्या तपासासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला तर अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करणे सोपे होऊ शकते. अशा गुन्ह्यांमध्ये पुरावे गोळा करण्यासाठी ‘नॅनो टेक्नॉलॉजी’ची मदत फार मोलाची ठरू शकते, अशी माहिती मुंबई पोलीस विभागाच्या मानद पोलीस समुपदेशक व ‘फॉरेन्सिक’ विषयातील संशोधक कामिनी भोईर यांनी दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, पोरवाल महाविद्यालय व इन्स्टिट्यूट आॅफ फॉरेन्सिक सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आयसीएफएम-२०१५’ आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी उपराजधानीत आल्या असताना ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.
वेळ व पैसा यांची बचत
‘नॅनोपार्टिकल’ आणि ‘टिटॅनियम डायआॅक्साईड’ यांच्या उपयोगातून खडबडीत पृष्ठभागावरील ‘फिंगरप्रिंट’देखील गोळा केले जाऊ शकतात. शिवाय ‘गोल्ड नॅनोपार्टिकल’मुळे तर ओली जागा किंवा वस्तूवरील ‘फिंगरप्रिंट’देखील घेता येते. ‘एएफएम’च्या उपयोगाने रक्ताच्या वाळलेल्या डागांचे परीक्षण करून ते किती वेळ अगोदरचे आहेत, हे अचूकपणे सांगता येणे शक्य आहे. जर पोलीस विभागात ‘नॅनोटेक्नॉलॉजी’चा मोठ्या प्रमाणावर उपयोग सुरू झाला तर अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करणे सोपे जाईल; शिवाय पैसा, वेळ यांचीदेखील बचत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
संशोधनावर भर देणार
आज जवळपास प्रत्येक क्षेत्रात ‘नॅनो टेक्नॉलॉजी’चा वापर दिसून येतो. ‘फॉरेन्सिक सायन्स’मध्येदेखील याचा जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येत आहे. साधारणत: गुन्हा जेथे घडला आहे तेथून फिंगरप्रिंट्स, रक्त इत्यादी बाबी गोळा करण्यात येतात व ‘फॉरेन्सिक सायन्स’च्या माध्यमातून याची तपासणी करण्यात येते. परंतु अनेकदा तंत्रज्ञानाच्या मर्यादेमुळे यात अडथळे येतात. ‘नॅनो टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून यावर नक्कीच मात करता येऊ शकते. आपल्याकडे याच्या संशोधनावर भर देऊन त्याला प्रत्यक्ष वापरात आणण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सूक्ष्म पुराव्यांचे होऊ शकते परीक्षण
आजच्या घडीला बहुतांश वेळा पोलीस विभागाकडून पुरावे गोळा करणे व त्याच्या परीक्षणासाठी ‘मायक्रो’ तंत्रज्ञानापर्यंत प्रामुख्याने वापर होतो. परंतु ‘फॉरेन्सिक सायन्स’मध्ये ‘नॅनो टेक्नॉलॉजी’ची तपास व सखोल परीक्षणासाठी मोठी मदत होऊ शकते. अगदी सूक्ष्म कणांच्या आकाराचे पुरावेदेखील या माध्यमातून गोळा करता येऊ शकतात. तसेच यांचे परीक्षण होऊन या माध्यमातून चौकशीला दिशा मिळू शकते. ‘नॅनो पार्टिकल्स’च्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांचा उपयोग करुन बंदुकीच्या काडतुसातील कण, अस्पष्ट फिंगरप्रिंट्स यांना गोळा करता येऊ शकते. शिवाय ‘एएफएम’ (आॅटोमॅटिक फोर्सड् मायक्रोस्कोप) व ‘एसईएम’ (स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप) यांच्या माध्यमातून अत्यंत सूक्ष्म कणांचेदेखील अध्ययन करता येते.