नंदिनीच्या यशाने मुरगूडमध्ये जल्लोष
By Admin | Updated: February 4, 2015 00:41 IST2015-02-04T00:38:32+5:302015-02-04T00:41:26+5:30
अंतिम लढतीत कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या हरियाणाच्या अनुभवी मल्ल रितूबरोबर कुस्ती झाली. सुरुवातीपासून खडाखडी झालेली ही कुस्ती तब्बल सहा मिनिटे चालली

नंदिनीच्या यशाने मुरगूडमध्ये जल्लोष
मुरगूड : केरळमध्ये सुरू असलेल्या ३५ व्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ४८ वजन किलो गटामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुरगूड (ता. कागल) येथील नंदिनी बाजीराव साळोखे हिने रौप्यपदक पटकाविले. ही बातमी समजल्यानंतर मुरगूडमध्ये नागरिकांनी जल्लोष केला. या यशामुळे नंदिनीची आंतरराष्ट्रीय कुस्ती शिबिरासाठी निवड झाली आहे. मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक कुस्ती आखाड्यात (साई) नंदिनी प्रशिक्षण घेत असून शिवराज कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गात शिकत आहे. नंदिनीचे वय या स्पर्धेच्या तुलनेत कमी असून म्हणजेच कॅडेट व ज्युनिअरचे वय असून या प्रौढांच्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने सहभाग घेऊन पदकाची कमाई केली. नंदिनीची पहिली लढत आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक विजेती पंजाबच्या प्रीतीबरोबर झाली. प्रीती ६ गुणाने आघाडीवर असताना नंदिनीने तिला गदालोट या डावावर चितपट करून विजय मिळवला. दुसऱ्या फेरीमध्ये नंदिनीची लढत दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय पदकप्राप्त शिक्षा हिच्याबरोबर झाली. शिक्षाने ४-३ अशा एका गुणाने आघाडी घेतली होती. त्याचवेळी नंदिनीने अगदी चपळाईने फ्रंट साल्तो डावावर तिला चितपट करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम लढतीत कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या हरियाणाच्या अनुभवी मल्ल रितूबरोबर कुस्ती झाली. सुरुवातीपासून खडाखडी झालेली ही कुस्ती तब्बल सहा मिनिटे चालली. यामध्ये रितूने चार गुणांची आघाडी घेतल्याने १०-६ अशा गुण फरकाने नंदिनीला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या महिला पथकामध्ये पहिलेच पदक मिळाल्यामुळे खेळाडूंच्यातही आनंद होता. नंदिनीला महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक व ‘साई’चे मुख्य प्रशिक्षक दादासो लवटे, संध्या पाणकुडे यांचे मार्गदर्शन मिळाले, तर साई आखाड्याचे संस्थापक सचिव सदाशिवराव मंडलिक, प्रा. संजय मंडलिक, वस्ताद सुखदेव येरूडकर, ‘शिवराज’चे प्राचार्य महादेव कानकेकर, क्रीडाशिक्षक प्रा. रवींद्र शिंदे यांचे प्रोत्साहन लाभले. (वार्ताहर)
आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू
नंदिनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुरगूडमध्ये आपल्या आई सरिताबरोबर राहते. नंदिनीचे वडील बाजीराव यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्याने सरिता यांना मोलमजुरी करून नंदिनीचा कुस्तीचा खर्च पूर्ण करावा लागतो. नंदिनीच्या यशाने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.