आयुष्याचा ‘मास्टरस्ट्रोक’ मारून नानांची ‘एक्झिट’

By Admin | Updated: November 2, 2014 00:58 IST2014-11-02T00:58:16+5:302014-11-02T00:58:16+5:30

ज्येष्ठ चित्रकार नाना गोखले यांचे आज वयाच्या १०३ व्या वर्षी निधन झाले. आयुष्यभर चित्रांसह वेगवेगळ्या कलामाध्यमात मुशाफिरी करुन स्वत:चा ठसा उमटविणाऱ्या नानांच्या ‘एक्झिट’ने

Nana's 'Exit' by killing 'Masterstruck' | आयुष्याचा ‘मास्टरस्ट्रोक’ मारून नानांची ‘एक्झिट’

आयुष्याचा ‘मास्टरस्ट्रोक’ मारून नानांची ‘एक्झिट’

१०३ वर्षांचे चित्रकार नाना गोखले यांचे निधन
नागपूर : ज्येष्ठ चित्रकार नाना गोखले यांचे आज वयाच्या १०३ व्या वर्षी निधन झाले. आयुष्यभर चित्रांसह वेगवेगळ्या कलामाध्यमात मुशाफिरी करुन स्वत:चा ठसा उमटविणाऱ्या नानांच्या ‘एक्झिट’ने कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी १ वाजता अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा आचार्य विवेक गोखले यांनी त्यांना भडाग्नी दिला.
नाना गोखले म्हणजे १०३ वर्षांचे सळसळता उत्साह असलेले युवकच. नानांशी गप्पा मारणे म्हणजे कलाप्रांतांच्या सर्व विषयांना स्पर्श करण्याचा उत्तम प्रवासच असायचा. नाना प्रत्येकाशीच वय विसरून बोलायचे. त्यामुळे त्यांचे ज्येष्ठ नव्हे तर युवा मित्र जास्त होते. नानांच्या पोट्रेट आणि चित्रातले स्ट्रोक्स चित्रकारांना नेहमीच खुणावत होते. त्यात सौंदर्य होते आणि कलात्मकताही. नानांना सध्याच काहीही होत नाही, असाच साऱ्यांचा विश्वास होता पण नानांनी शनिवारी या जगाचा समाधानाने निरोप घेतला. आयुष्याचा ‘मास्टरस्ट्रोक’ मारून नानांनी घेतलेली ‘एक्झिट’ चटका लावणारी आहे.
नानांनी त्यांच्या वयाचे शतक पार केले होते पण तरीही त्यांच्या चाहत्यांना नाना हवे होते. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त झाली अन् त्यांची उणीवही आता जाणवते आहे. नाना चित्रकार होतेच पण त्यांना संगीत आणि साहित्याचाही व्यासंग होता. त्यामुळेच त्यांच्या चित्रात जीवनाच्या सौंदर्याची आणि आशावादाची आणि निखळ आनंदाची पेरणी बेमालुमपणे असायची. नव्या चित्रकारांना नानांची चित्रे प्रेरणा देणारी आहेत. नानांनी स्वत:चेच १३६ पोर्ट्रेट आरशासमोर बसून काढले पण नानांच्या चित्रांचा विषय मात्र निसर्गच होता. त्यांनी काढलेली ८० टक्के चित्रे ही निसर्गचित्रे, लॅण्डस्केप आहेत. निसर्गावर प्रेम करणारा हा चित्रकार आत्मस्वरुपात आज निसर्गाशीच एकरूप झाला.
नाना गोखले म्हणजे विदर्भातले बहुआयामी व्यक्तिमत्त्व. नाना चित्रकार म्हणून प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले असले तरी नानांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगवेगळे आयाम होते. नाना साहित्याचे अभ्यासक, संस्कृतचे जाणकार, कवी, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, संगीताचे जाणकार आणि चित्रकार होते. कला माध्यमात स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या नानांनी आज समाधानाने जगाचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रकृतीचा त्रास होत होता. नानांचे वय १०३ वर्षांचे असले तरी नाना अखेरपर्यंत उत्साही होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सकाळच्या पहिल्या सत्रातच मतदान केले होते. चित्रकार म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख होती. विशेषत: अखेरपर्यंत त्यांच्या चित्राकृतीचे काम सुरूच होते. त्यांचे अखेरचे चित्र त्यांनी चार महिन्यांपूर्वी काढले. स्वत:चेच पोट्रेट त्यांनी १३६ वेळा काढले आहे. शुक्रवारी रात्री त्यांना कफाचा त्रास जाणवला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी रात्री जेवण घेतले नाही. पण रात्री १ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. नानांनी अनेक पुस्तके लिहिली आणि संस्कृत ते मराठी असा अनुवादही केला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच चित्रकार, लेखक आणि कला माध्यमातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. गांधी विचाराने प्रभावित होऊन नाना गांधीवादी झाले. मामा क्षीरसागरांच्या गोवामुक्ती, शुद्धी आंदोलनाचा त्यांच्यावर प्रभाव होता. दरम्यानच्या काळात दर्यापूरला शिक्षक म्हणून ते रुजू झाले. बालगंधर्वांकडे काही काळ संगीताचे धडे गिरवले. ख्रिश्चन महाविद्यालयात नोकरीला असताना त्यांनी बायबलचा अभ्यास केला आणि ख्रिस्त स्वीकारला, पण बाप्तिस्मा केला नाही. यामागे त्यांचा ‘रॅशनल’ विचार होता. गीतेचे हिंदी आणि इंग्लिशमध्ये त्यांनी भाषांतर केले. नानांच्या निधनाने एक मर्मज्ञ व्यक्तिमत्व हरपल्याची खंत कलाक्षेत्रात व्यक्त करण्यात आली.

Web Title: Nana's 'Exit' by killing 'Masterstruck'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.