नानाकाका रागावले, बरं मग?

By Admin | Updated: February 18, 2015 02:27 IST2015-02-18T02:27:21+5:302015-02-18T02:27:21+5:30

नानाकाका लोकांशी सौजन्याने वागले; साऱ्यांंची त्यांनी प्रेमभरे वास्तपुस्त केली; ज्यांच्या व्यासपीठावर चढले; त्यांची तोंडदेखले का होईना; प्रशंसा केली,

Nanaakaka angry, well? | नानाकाका रागावले, बरं मग?

नानाकाका रागावले, बरं मग?

हेमंत कुलकर्णी - नाशिक
नानाकाका लोकांशी सौजन्याने वागले; साऱ्यांंची त्यांनी प्रेमभरे वास्तपुस्त केली; ज्यांच्या व्यासपीठावर चढले; त्यांची तोंडदेखले का होईना; प्रशंसा केली, भोवतीच्या गराड्यासमोर खळखळून हसले, असे काही घडले तर ती बातमी! पण नानाकाका रागावले, यात कुठली आली बातमी? ते तसेही डोक्यात राख घालून फिरतच असतात आणि फिरता फिरता डोक्यात आणखी कोणती आणि किती राख घालून घ्यायची याचे निमित्त शोधत असतात. बारामतीत झालेली परवाची पवार-मोदी भेट, हे त्यांना गवसलेले लेटेस्ट निमित्त, इतकेच. पण त्यांनी या निमित्तावरून बरीच आगपाखड केली.
नाना पाटेकरांनी म्हणे मोदींना भाबडेपणाने (नाना आणि भाबडा? कोण ऐकतंय रे तिकडे) मतदान केले तेच बहुधा मोदींनी पवारांच्या पार्टीला करप्ट पार्टी म्हणून संबोधल्याबद्दल आनंदी होऊन. त्यामुळे ज्यांना काल तुम्ही हिणवलंत त्यांच्याच गळ्यात आज गळे घालून आमच्यात कोणतेही वितुष्ट नाही असे सांगाल तर कसे पटावे, हा नानांचा रोकडा सवाल.
मुळात नाना मुंबई वा पुण्याचे मतदार (चूभूदेघे) असल्याने त्यांनी व्यक्तिगतरीत्या मोदींना मत देण्याची सुतराम शक्यता नाही. मोदींच्या एखाद्या पिलांटूला दिले असल्यास ती बाब निराळी. पण तरीही मुदलात नानांनी दिलेले मत गुप्त. ते तसे असावे ही लोकशाहीची प्राथमिक अपेक्षा. तरीही त्यांनी या अपेक्षेला छेद देत, गोपनीयता फोडली. फोडली तर फोडली, पण ज्या शब्दातच मुळात ‘दान’ आहे, त्या दानाबाबत म्हणतात, उजव्या हाताने दिले तर डाव्याला ते कळता कामा नये. पण नानानी त्याचा जाहीर उच्चार केला. म्हणजे नानांचा प्रमाद क्रमांक दोन. (यापुढील प्रमाद कृपया वाचकांनीच मोजावेत)
राजकीय किंवा वैचारिक मतभेद म्हणजे व्यक्तिगत वितुष्ट नव्हे, ही बाब अनेकांनी अनेकवार स्पष्टपणाने बोलून दाखविली आहे. नाना म्हणतात, त्याप्रमाणे वागायचे ठरविले तर पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घ्यायलाच नको होती. ‘दूर हो जा मेरी नजरों के सामने से’! पण तसे झाले नाही, तसे होत नसते. ज्या देशाला आपण सारे न चुकता, शत्रू मानतो, त्या पाकिस्तानच्या पंतप्रधानालाही मोदींनी परवाच फोन करून क्रिकेट सामन्याविषयीच्या ख्यालीखुशालीची चर्चा केली होती. राजकारणी वेगळा, सत्ताकारणी वेगळा आणि मुत्सद्दी तर त्याहूनही वेगळा. ‘हमने आपके उपर सारी उम्मीदे लगा रख्खी थी और आपही बेवफा निकले’ अशासारखा काहीतरी नानाकाकांचा मोदी कांकांवरचा राग दिसतो. आणि या रागाचे निमित्त शरदकाका बारामतीकर! त्यांना मोदी भेटले आणि साक्षात त्यांच्या अंगणात जाऊन भेटले, याचा मनस्वी संताप नानांना आलेला दिसतो. म्हणजे मोदींवरील त्यांचा संताप सात्त्विक म्हणायचा तर पवारांवरील त्यांचाच संताप क्रोधाग्नीपूर्ण म्हणायचा. असे का बरे?
कुठलाशा एका मराठी सिनेमा किंवा दूरचित्रवाणीच्या बक्षीस समारंभाची एक चित्रफीत वारंवार छोट्या पडद्यावर झळकत असते. त्या समारंभात नानाकाका आणि शरदकाका दोघेही हजर होते. शरदकाकांच्या हस्ते त्यात नानाकाकांचा गौरव होतो. तेव्हां याच शरदकाकांविषयी नाना बोलतात, तेव्हां त्यांच्या स्वादुपिंडाचा पाझर त्यांच्याच ओष्ठकडांपर्यंत आल्याचा दर्शकाला भास होत असतो. मग यकायक तेच शरदकाका इतके दुष्ट निघावेत की त्यांच्या संगतीत गेल्याने नरेन्द्रचाचू पार बिघडून जातील असे भय नानाकाकांना वाटावे? हे भय तरी किती पराकोटीचे? सुसंगतीचा असा वारंवार त्याग होणार असेल तर मग तुम्हा परीस शिवसेना, मनसे आणि एमआयएम काय वाईट, असा मोठा बिकट सवालही नानांच्या मनात तरळून गेलेला दिसतो. म्हणजे काय, हे तिघे तसे ‘कामसे गये’ कॅटॅगरीतलेच!
तरीही असे बोलले जाते की, नाना म्हणजे रोखठोक आणि परम देशभक्त माणूस. ‘एक बार ठान ली तो, फिर अपनी भी ना सुननेवाला’! त्यामुळे मध्यंतरी नानानी एक प्रतिज्ञा करून टाकली, संजय दत्तबरोबर कदापि काम न करण्याची! (जणू संजूबाबाने नाना नाना करीत अंथरूणच धरले होते) का, तर म्हणे तो देशद्रोही आहे. खरेतर ही प्रतिज्ञा केली, तेव्हा संजय दत्तला टाडा कोर्टाने देशद्रोहाच्या आरोपातून मुक्त केले होते आणि बेकायदा शस्त्रे बाळगण्याच्या गुन्ह्याखाली शिक्षा केली होती.
पण जेव्हा म्हणजे मुंबईतील जातीय दंग्यांच्या नंतर संजय दत्तला पोलिसांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करून अंडा सेलमध्ये ठेवले होते तेव्हा त्याच्या पाठीशी उभे राहणारे, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील केवळ एकच बलदंड नाव पुढे आले होते व ते होते, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे. त्यांनी त्या वेळी घेतलेल्या भूमिकेच्या ऋणात जसे संजयपिता सुनील दत्त अगदी अखेरपर्यंत होते (काँग्रेसचे खासदार असूनही त्यांना पक्षातून कोणाची सहानुभूती मिळाली नव्हती) तसाच संजूबाबादेखील आहे. पण तेव्हा नानाकाकांनी बाळासाहेबांना उद्देशून, असे काही म्हटले नव्हते की, बाळासाहेब, आम्ही तुमच्यावर मनस्वी प्रेम करतो, तुमच्या आज्ञेवरून मतदानही करतो, तुम्ही प्रखर देशाभिमानी आहात म्हणूनच आम्ही तुमच्यावर जीव ओवाळून टाकतो आणि आता तुम्हीच एका देशद्रोह्याच्या पाठीशी उभे राहता? छे, छे, बाळासाहेब, मग तुमच्यापेक्षा अबू आझमी काय वाईट?
सबब, नानाकाका तुमचं हे वागणं, बोलणं आणि फिस्कारणं बघितल्यावर अकबर इलाहाबादी यांची क्षमा मागून असंच म्हणावंसं वाटतं की,
हम कत्ल भी करते है;
तो चर्चा नही होता,
और वो आह भी भरते है;
तो हंगामा खडा होता!

 

Web Title: Nanaakaka angry, well?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.