Devendra Fadnavis Rahul Narvekar: राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीनंतर विधानसभेत मजेशीर किस्से घडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना आमदार नाना पटोले यांना मिश्कील टोला लगावला. त्यानंतर सभागृहात सगळेच हसले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मुंबईमध्ये जन्माला आलेले राहुल नार्वेकर हे कदाचित पहिलेच असे अध्यक्ष असतील. जे पहिल्याच टर्ममध्ये (पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर) अध्यक्ष बनले आणि पुन्हा दुसऱ्यांदा ते लागोलाग अध्यक्ष बनले."
पटोलेंबद्दल काय बोलले फडणवीस?
"नानाभाऊ तुमचेही विशेष आभार आहेत. तुमच्यापेक्षा तसे ते (राहुल नार्वेकर) लहान आहेत १३-१४ वर्षांनी; माझ्यापेक्षाही लहान आहेत, पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळी ते अध्यक्ष बनू शकले. अर्थात त्याआधी त्यांना विधान परिषदेत काम करण्याची संधी मिळाली", असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनीनाना पटोले यांना मिश्कील टोला लगावला.
दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे राहुल नार्वेकर चौथे
फडणवीस म्हणाले, "खरंतर पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान आजवर चारच लोकांना मिळाला आहे. ज्यामध्ये कुंदनमल फिरोदिया, सयाजी सीलम, बाळासाहेब भारदे आहेत आणि त्यानंतर राहुल नार्वेकर आहेत. कुंदनलाल फिरोदिया आणि सयाजी सीलम हे मुंबई राज्याचे अध्यक्ष होते. सयाजी सीलम दुसऱ्यांदा जेव्हा अध्यक्ष झाले, तेव्हा महाराष्ट्र राज्याचे झाले", असा इतिहासही फडणवीसांनी सांगितला.