राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 13:38 IST2025-09-17T13:37:01+5:302025-09-17T13:38:19+5:30

नव्याने विकसित झालेल्या या उद्यानांची विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

'Namo Udyan' to be developed at 394 places in the state; DCM Eknath Shinde announcement on Narendra Modi birthday | राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई - राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये वैशिष्टयपूर्ण व नविन नगरपंचायत,नगरपालिका योजनेअंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करतानाच या उद्यानांना ‘नमो उद्यान’ नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील एकूण ३९४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान वर्षभरात विकसित करण्यात येतील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राने दिलेली ही भेट असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. नव्याने विकसित झालेल्या या उद्यानांची विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून प्रत्येक विभागातून ३ नगरपरिषद/नगरपंचायतींना बक्षिसे देखील देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 

तर नमो उद्यानांच्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना जाहीर करण्यात येतील. त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी पाच कोटी, द्वितीय तीन तर तृतीय क्रमांकासाठी एक कोटी रुपये अशी बक्षिसाची रक्कम अतिरिक्त विकास निधी म्हणून विजेत्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना देण्यात येणार आहे.

मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा

मागील अकरा वर्षांत नरेंद्र मोदी यांनी केलेले काम हे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावे असेच आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच मी मोदींची संवाद शाधून त्यांचे आशीर्वाद घेतले. मी खरे तर शिवसैनिक. भारतीय जनता पक्षासारख्या राष्ट्रीय स्तरावरील बलाढ्य पक्षाचे नेतृत्व करणारे मोदीजी माझ्यासारख्या शिवसैनिकाला विश्वासाने जबाबदारी देतात, ही अत्यंत मोठी बाब होती. गेल्या काही वर्षांत त्यांच्या अनेकदा भेटी झाल्या. कधी काही मिनिटांचा संवाद, तर कधी दीर्घ चर्चा. प्रत्येक भेटीत त्यांचा सुस्पष्ट विचार, हलक्या-फुलक्या कोपरखळ्या आणि आत्मीयता अनुभवायला मिळाली. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य आनंद दिघे यांच्या विचारांसोबतच मोदींचे कार्यही आम्ही शिवसैनिक असो किंवा भारतीय जनता पार्टी असो, प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा देते असं सांगत शिंदेंनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title: 'Namo Udyan' to be developed at 394 places in the state; DCM Eknath Shinde announcement on Narendra Modi birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.