‘फिजिओथेरेपी’साठी अभ्यासक्रम नसलेल्या महाविद्यालयाचे नाव
By Admin | Updated: July 2, 2014 00:51 IST2014-07-02T00:51:49+5:302014-07-02T00:51:49+5:30
वैद्यकीय आणि आरोग्यशास्त्रातील फिजिओथेरेपी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा (सीईटी) ऊत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भंडारा जिल्ह्यातील ज्या महाविद्यालयाचे नाव देण्यात आले आहे,

‘फिजिओथेरेपी’साठी अभ्यासक्रम नसलेल्या महाविद्यालयाचे नाव
भंडारा : वैद्यकीय आणि आरोग्यशास्त्रातील फिजिओथेरेपी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा (सीईटी) ऊत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भंडारा जिल्ह्यातील ज्या महाविद्यालयाचे नाव देण्यात आले आहे, त्या महाविद्यालयात हा अभ्यासक्रम नाही. राज्याच्या तंत्रशिक्षण संचलनालयाने (डायरेक्टरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) या महाविद्यालयाचे नाव संकेतस्थळावर जाहीर करुन विद्यार्थ्यांना यादीही पाठवून आपल्या भोंगळ कारभाराचा परिचय दिला आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाने भिलेवाडा येथील फिजिओथेरेपी महाविद्यालय अलॉट केल्यामुळे विद्यार्थी आणि पालक दिलेला पत्ता शोधत भिलेवाडा येथे पोहोचत आहेत. परंतु ज्या महाविद्यालयाचे नाव संकेतस्थळावर देण्यात आले आहे, त्या महाविद्यालयात हा अभ्यासक्रमच नसल्याचे उघडकीस आले आहे.
महाविद्यालयात फिजिओथेरेपी किंवा समकक्ष कोणताही अभ्यासक्रम नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निराश होऊन परतावे लागत आहे.
यादीत भिलेवाडाचे नाव
असोसिएशन आॅफ मॅनेजमेंट आॅफ अनएडेड मेडिकल अॅण्ड डेन्टल महाविद्यालयाने सत्र २०१४-१५ साठी मेडिकल, डेन्टल आणि अन्य आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेशासाठी पात्र महाविद्यालयांची यादी जाहीर केली. अनेक विद्यार्थ्यांची नावे भिलेवाडा येथील सन्मार्ग शिक्षण संस्थेद्वारा संचालित कॉलेज आॅफ फिजिओथेरेपी येथे देण्यात आली आहेत. मात्र प्रत्यक्षात भंडारा जिल्ह्यात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एकही महाविद्यालय अस्तित्वात नाही. भंडाऱ्यापासून सहा किलोमीटर अंतरावर सन्मार्ग शिक्षण संस्थेचे भिलेवाडा येथे अभियांत्रिकी, डिप्लोमा अभ्यासक्रमाचे महाविद्यालय आहे. परंतु तिथे फिजिओथेरेपी किंवा आरोग्यशास्त्र अभ्यासक्रम नाही. महाविद्यालयाची डोकेदुखी वाढली
यासंदर्भात भिलेवाडा स्थित अभियांत्रिकी महाविद्यालयात संपर्क साधला असता ते म्हणाले, तंत्रशिक्षण संचालनालयाने संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या नावापुढे महाविद्यालयाचे नाव जाहीर केले आहे. विद्यार्थी प्रवेशासाठी मोठ्या संख्येने येत आहेत. नागपूर व मुंबई येथील तंत्रशिक्षण संचलनालय कार्यालयाशी संपर्क साधला असता दूरध्वनी वाजतो, पण कुणीच उचलत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)