नागपूरची संत्री हवीत, चला मग लॉगीन करा...
By Admin | Updated: February 8, 2015 01:35 IST2015-02-08T01:35:13+5:302015-02-08T01:35:13+5:30
पुण्यातील ‘आयटी’ क्षेत्र जगभरात हातपाय पसरत असताना विदर्भातील शेतकऱ्यांनी पुण्याच्या आयटी कंपन्यांमध्ये लॉग-इन करून संत्राविक्रीसाठी खुल्या बाजारपेठेत शिरकाव केला आहे.

नागपूरची संत्री हवीत, चला मग लॉगीन करा...
हणमंत पाटील ल्ल पुणे
पुण्यातील ‘आयटी’ क्षेत्र जगभरात हातपाय पसरत असताना विदर्भातील शेतकऱ्यांनी पुण्याच्या आयटी कंपन्यांमध्ये लॉग-इन करून संत्राविक्रीसाठी खुल्या बाजारपेठेत शिरकाव केला आहे. परिणामी, दलालाच्या मध्यस्थीशिवाय शेतकऱ्यांना आपले उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता आले. त्यातून अवघ्या दोन महिन्यांत तब्बल ४४ लाखांची उलाढाल झाली आहे.
आॅनलाइन जमान्यात उत्पादक ते ग्राहक अशी संकल्पना रूढ होत आहे. शेतकरी मात्र दलाल, आडत्यांच्या चक्रव्यूहातून अजून बाहेर पडू शकलेला आहे. यामध्ये व्यापारी व मध्यस्थ गब्बर होत चालले आहेत, पण शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मात्र घसरत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील पणन महामंडळाशी सलग्न असलेल्या ‘कन्व्हर्जन्स आॅफ अॅग्रीकल्चरल इन्टरव्हेन्शन इन महाराष्ट्र’ (सीएआयएम) व ‘आपुलकी’ या संस्थांनी अमरावती येथे विदर्भातील शेतकऱ्यांच्या एका गटाची बैठक घेतली. या संस्थांनी पुण्यातील २९ आयटी कंपन्यांकडे पत्र पाठवून संत्र्यांच्या आॅनलाइन थेट विक्रीच्या सुविधेसाठी परवानगी मागितली. त्यापैकी ९ आयटी कंपन्या व काही गृहनिर्माण संस्थांनी तयारी दाखविली. त्यानुसार शेतकऱ्यांनी संत्र्याचे पेटारे थेट या कंपन्यांत उतरवले. शेतकऱ्यांकडून व्यापारी ११ रुपये किलोने संत्री घेतात. येथे मात्र शेतकऱ्यांना ४० रुपये भाव मिळाला. पुण्यातील किरकोळ बाजार व मॉलमध्ये संत्री ६० रुपये किलोने विकले जात असताना ग्राहकांना ते ४० रुपये किलोने मिळाल्याने त्यांचाही फायदा झाला. दलालाशिवाय थेट विक्री केल्याने शेतकऱ्यांना ३३ लाखांचा फायदा झाला, असे ‘आपुलकी’चे अभिजित फाळके व ‘सीएआयएम’चे रवींद्र ठाकरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आयटी कंपन्यांमध्ये विदर्भातील शेतकऱ्यांना थेट विक्रीची संधी मिळाली. त्यामुळे उत्पादकांनीही १ किलोऐवजी ३ किलोच्या आकर्षक पेटीतून संत्राविक्रीस सुरुवात केली. एका पेटीमागे २० रुपयांची सूट देत किफायतशीर भाव ग्राहकांना दिला.
महोत्सवातून ‘आत्मविश्वास’ गवसला
संत्रा उत्पादकांसाठी पुण्यातील बालगंधर्व येथे महोत्सव झाला. त्या वेळी थेट पुण्यातील चोखंदळ ग्राहकांशी संवाद साधता आला. महोत्सवात पुणेकरांनी संत्राबर्फीचेही बुकिंग केले होते. त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळाला.
- नितीन देशमुख, रवी पाटील, संत्री उत्पादक : अमरावती