संगीत विषयाची शिक्षणक्षेत्रात उपेक्षा होते आहे
By Admin | Updated: January 28, 2015 01:08 IST2015-01-28T01:08:53+5:302015-01-28T01:08:53+5:30
संगीताचे क्षेत्र फार व्यापक आहे. उदारीकरणाच्या काळात तर संगीताचे विविध जागतिक प्रवाह आणि त्यांची संमिश्रताही अभ्यासण्यासारखी आहे. इतर क्षेत्रांप्रमाणेच संगीत क्षेत्रातही सध्या अनेक

संगीत विषयाची शिक्षणक्षेत्रात उपेक्षा होते आहे
सुप्रसिद्ध पार्श्वगायक शंकर महादेवन यांची खंत
नागपूर : संगीताचे क्षेत्र फार व्यापक आहे. उदारीकरणाच्या काळात तर संगीताचे विविध जागतिक प्रवाह आणि त्यांची संमिश्रताही अभ्यासण्यासारखी आहे. इतर क्षेत्रांप्रमाणेच संगीत क्षेत्रातही सध्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि संगीतात आपले भविष्य घडविण्याचे पर्यायही उपलब्ध आहेत. पण संगीत या विषयाकडे शिक्षण क्षेत्रात अद्यापही फारसे गांभीर्याने बघितले जात नाही. संगीत हा विषय दुय्यम ठेवला जातो. शिक्षणक्षेत्रात संगीत विषयाची ही उपेक्षा थांबायला हवी, असे मत सुप्रसिद्ध पार्श्वगायक शंकर महादेवन यांनी मंगळवारी व्यक्त केले.
दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये सुरू असलेल्या शंकर महादेवन संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक कार्यक्रमासाठी ते स्कूलमध्ये आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. शाळा आणि महाविद्यालयात संगीत हा विषय केवळ गुणांशी (मार्क्स) जोडला जातो. त्यामुळे विद्यार्थीही गुण मिळविण्यासाठीचा विषय म्हणून संगीत शिकतात. पण शाळांमध्ये संगीत फारसे गांभीर्याने शिकविले जात नाही. यात नक्कीच काही अपवाद आहेत. हा विषय गुण मिळविण्याचा नाहीच. तो आपल्या व्यक्तिमत्त्वात सुधार आणणारा आणि आपली सृजनशील शक्ती वाढविणारा, आनंद देणारा विषय आहे. त्यामुळे संगीत हा विषय दुय्यम न ठरविता शिक्षणक्षेत्रात गांभीर्याने शिकविला गेला आणि त्यातून विद्यार्थ्यांना आनंद मिळेल, अशी व्यवस्था केली तर अनेक संगीतकार तयार होतील. विद्यार्थ्यांना गंभीरपणे संगीत शिकविले तर त्यातून प्रत्येक विद्यार्थी संगीतकार, गायक होणार नाहीत पण ते ज्या क्षेत्रात जातील, त्या क्षेत्रात अधिक चांगले काम करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण होईल. ही शक्ती संगीतात आहे. यासाठी संगीत शिकविण्याच्या पद्धतीतही आमूलाग्र बदलाची आवश्यकता असल्याचे मत संगीतकार शंकर महादेवन यांनी व्यक्त केले.
मराठी संगीतात सध्या अनेक नवे प्रयोग करण्यात येत आहेत. त्यामुळे मराठी संगीताचा प्रेक्षकही वाढतो आहे. विशेषत: मराठी कवितांचा दर्जा आणि मराठी संगीताची गुणवत्ता राखली जात असल्याने दर्जेदार मराठी संगीत निर्माण होते आहे. त्यामुळेत लोकमान्य टिळक, मितवा, कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटांमध्ये मला गायनाची संधी मिळाली. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटाबद्दल मी ऐकले आहे पण हा चित्रपट अद्याप मी पाहू शकलो नाही. पण त्यांचे कार्य जवळून पाहिले असून त्यांच्याविषयी मला आदर आहे.