सिल्लोडमध्ये गावठाण जागेच्या वादातून दलित तरुणाचा खून
By Admin | Updated: August 17, 2016 16:23 IST2016-08-17T16:23:54+5:302016-08-17T16:23:54+5:30
सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे गावठाण जागेच्या मालकी हक्का वरून दोन गटात( दलित- मुस्लीम) तुंबळ हाणामारी झाली.

सिल्लोडमध्ये गावठाण जागेच्या वादातून दलित तरुणाचा खून
श्यामकुमार पुरे/ ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 17 - सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे गावठाण जागेच्या मालकी हक्का वरून दोन गटात( दलित- मुस्लीम) तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या दलित युवकाचा बुधवारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी ८ लोकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून एका आरोपीस अटक केली आहे.
७ आरोपीं फरार आहे. या घटनेमुळे डोंगरगाव येथे तणाव पूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेत मरण पावलेल्या दलित युवकाचे नाव अमोल अशोक दांडगे वय २८ वर्ष रा.डोंगरगाव असे आहे. तर त्याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून त्याचा खून करणाऱ्या शेख मोहम्मद जाकीर शेख मोहम्मद उमर (वय ३४ रा. डोंगरगाव) यास पोलिसांनी अटक केली आहे. इतर ७ फरार आरोपी म्हणजेच इसाक उमर शेख, अहेमद उमर शेख, शाकीर उमर शेख, तकिया उमर शेख, रफिक उमर शेख, फारुख उमर शेख व फारुख उमर शेख यांचा मुलगा (नाव माहीत नाही) सर्व डोंगरगाव येथील रहिवासी आहेत.
डोंगरगाव येथे १४ ऑगस्ट रोजी शिवारातील गट क्र. ३१३ मधील गावठाण वादग्रस्त जागेच्या मालकी हक्काच्या कारणावरून दलित आणि मुस्लिम या दोन गटांत लाठ्याकाठ्या, दगडांनी तुंबळ हाणामारी झाली होती. त्यात मुस्लिम लोकांनी दलित समाजाच्या अमोल अशोक दांडगे, इंदुमती अशोक दांडगे, वैशाली अशोक दांडगे, उषा अशोक दांडगे यांना बेदम मारहाण केली होती. जखमींवर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. तर अमोल याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी उपचार सुरू असताना अमोलचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी १४ ऑगस्ट रोजी कलम ३२४, ३२३, १४३, १४८, १४९, ५०४, ५०६, अ.जा.प्र.अ.नुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. त्या नंतर अमोलची प्रकृती चिंताजनक असल्याने ३०७ कलम वाढवण्यात आली आणि बुधवारी सकाळी ८.४५ वाजता अमोलचा मृत्यू झाल्याने सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी दुपारी 8 आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला.
काय होता वाद
डोंगरगाव येथील गावठाण जमिनीवर १५ बाय ६० फूट जागेवर येथील दलित व मुस्लिम समाजाचा जागेच्या ताब्यावरून वाद सुरू होता. यापूर्वी सन २०१४ मध्ये पण या जागेच्याच वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. त्यात इंदुबाई यांच्या तक्रारीवरून व फातेमा उमर शेख यांच्या तक्रारीवरून परस्परविरोधी मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात आरोपी इसाक उमर शेख यांनी सिल्लोड न्यायालयात मनाई हुकूमचा दावा दाखल केला आहे. अजून हा वाद न्यायप्रविष्ट आहे.
यापूर्वीही आरोपीवर अॅट्रॉसिटी दाखल होता
सदर खून करणाऱ्या 8 आरोपींवर सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात २२ फेब्रुवारी १६ रोजी विनयभंग, मारहाण, अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याचा राग अनावर झाल्याने या वेळी दलित कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या वादाचा शेवट अमोलच्या हत्येनं झाला.
डोंगरगाव येथे पोलीस बंदोबस्त तैनात
डोंगरगाव येथील एका दलित युवकाचा खून झाल्याने गावात तणावपूर्ण शांतता असल्याने या गावात १ पोलीस निरीक्षक, ३ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४ फौजदार, ५७ पोलीस कर्मचारी, १५ होम गार्ड, आरसीपीची एक तुकडी तैनात करण्यात आली
आहे. या परिस्थितीवर वनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बी. डी. मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे लक्ष ठेवून आहेत. गावात तणावपूर्ण शांतता आहे.