खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेला पॅरोलवर सोडलेल्या फरार आरोपीला चार वर्षांनंतर अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 21:27 IST2025-08-05T21:27:40+5:302025-08-05T21:27:40+5:30
खुनाच्या गुन्ह्यात दोषसिध्द झालेला जेल प्रशासनाने पॅरोलवर सोडलेल्या सुमारे ४ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीला पंजाब येथून अटक करण्यात आली.

खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेला पॅरोलवर सोडलेल्या फरार आरोपीला चार वर्षांनंतर अटक
खुनाच्या गुन्ह्यात दोषसिध्द झालेला जेल प्रशासनाने पॅरोलवर सोडलेल्या सुमारे ४ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीला पंजाब येथून अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या टीमला यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी मंगळवारी दिली आहे.
१५ सप्टेंबर २०१६ रोजी संध्याकाळी आरोपी शंकर मुखीया ऊर्फ समोसेवाला याने मयत दिलीप बसनेत याचे पत्नीबाबत अश्लील बोलला होता. त्यानंतर आरोपी व मयत त्यांच्यात वाद होऊन आरोपीने मयताच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन जीवे ठार मारले होते. याप्रकरणी वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. आरोपी शंकरला वसई सत्र न्यायालय यांनी दोषसिध्द ठरवून त्यास शिक्षा सुनावली होती. या गुन्ह्यात आरोपी हा ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असताना त्याला कारागृह प्रशासनाने आपातकालीन अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. त्याचा रजेचा कालावधी ७ मे २०२२ रोजी संपला होता. त्यानंतर त्याला कारागृहामध्ये हजर होण्यासाठी कळविले होते. पण तो कारागृहात तसेच पोलीस ठाण्यात हजर न राहता फरार झाला होता. कारागृह शिपाई संतोष मगर यांनी जेल प्रशासनाच्या तर्फे पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता.
या आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांनी आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस पथकाने तपास सुरु केला. आरोपी राहण्यास असलेल्या धानिवबाग येथील पत्यावर जाऊन शोध घेतला असता आजुबाजुच्या परिसरात आरोपी आला नसल्याची माहिती मिळाली. आरोपीच्या मुळ गावी देखील बातमीदारामार्फत माहिती घेतल्यावर तो गावी देखील राहायला आला नसल्याची माहिती मिळाली. आरोपी वारंवार त्याचे नाव बदलुन अस्तित्व लपवुन वेगवेगळया ठिकाणी राहत असल्याने त्याचा शोध घेण्यात अडथळा निर्माण होत होता. गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक आरोपीचा २ महिन्यापासून सातत्याने शोध घेत असतांना बातमीदारामार्फत तो पंजाबमधील भगतसिंग नगर जिल्ह्यात त्याची ओळख बदलुन वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली. यानंतर आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस पथक भगतसिंग नगर, पंजाब येथे रवाना करण्यात आले होते. पोलीस पथकाने दोषसिध्द झालेला आरोपी शंकर जगदीश मुखीया ऊर्फ समोसेवाला (३४) याला बंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन अटक केली आहे.
कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सपोनि सोपान पाटील व सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गीते, सहा. पोलीस उप निरीक्षक संजय नवले, मुकेश पवार, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, पोहवा प्रफुल्ल पाटील, प्रशांतकुमार ठाकुर, सचिन पाटील, जगदीश गोवारी, दादा आडके, सुधीर नरळे, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, प्रतिक गोडगे, राज गायकवाड, मसुब रामेश्वर केकान, अविनाश चौधरी आणि सायबरचे सहा. फौजदार संतोष चव्हाण यांनी केली आहे.