मुंबई : महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर आता भाजप-शिंदेसेनेचा भगवा फडकला असून, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतही महायुतीची पकड घट्ट झाली आहे. बहुतांश महापालिकांमध्ये भाजपा आणि महायुतीची सत्ता असली तरी काही महापालिका या महाविकास आघाडीच्या घटकपक्षांकडे राहिल्या आहेत.
ही महापालिका निवडणूक राजकीय पक्षांना बरेच धक्के देऊन गेली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कुठेही यश मिळालेले नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबई गमवावी लागली तर परभरणीत ते काँग्रेसच्या मदतीने सत्तेत येणार आहेत. हा एकमेव दिलासा ठाकरेंना मिळालेला आहे.
महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. मात्र, विदर्भातील चंद्रपूर आणि मराठवाड्यातील लातूर व परभणी या तीन महत्त्वाच्या महापालिकांमध्ये मविआने आपला गड राखला आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीने मुसंडी मारली असली, तरी तिथे अटीतटीची लढत पाहायला मिळाली. वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या 'बविआ'ने आपले अस्तित्व टिकवून ठेवत दोन्ही मोठ्या आघाड्यांना रोखले आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवत 'स्मार्ट सिटी'च्या अजेंड्यावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसत आहे.
महाविकास आघाडीकडे असलेल्या महापालिका...
१. लातूर: येथे काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले आहे. २. चंद्रपूर: येथेही काँग्रेसची सत्ता आली असून महाविकास आघाडीचा प्रभाव दिसून येतो. ३. परभणी: येथे संपूर्ण महाविकास आघाडीने एकजुटीने सत्ता मिळवली आहे. ४. मालेगाव: येथे स्थानिक आघाडीची सत्ता असली तरी राजकीय समीकरणात ती महाविकास आघाडीला पूरक ठरू शकते.