मुंढे महापालिकेत एका दिवसासाठीही वादग्रस्तच

By Admin | Updated: April 8, 2017 01:17 IST2017-04-08T01:17:32+5:302017-04-08T01:17:32+5:30

विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास महापालिकेत आलेले पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे हे काही तासांमध्येच आपली छाप सोडून गेले.

The municipal corporation is also contentious for one day | मुंढे महापालिकेत एका दिवसासाठीही वादग्रस्तच

मुंढे महापालिकेत एका दिवसासाठीही वादग्रस्तच

पुणे : विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास महापालिकेत आलेले पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे हे काही तासांमध्येच आपली छाप सोडून गेले. पदाधिकाऱ्यांना निवडणुकीत प्रवेशबंदी करून त्यांनी वाद ओढवून घेतला. सत्ताधारी भाजपाने त्याकडे लक्ष दिले नाही तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र महापौरांचा अवमान झाला असल्याची टीका केली.
विभागीय आयुक्तांनी या निवडणुकांसाठी मुंढे यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यासाठी शुक्रवारी ते महापालिकेत आले. या निवडणुकीसाठी महापौर, सभागृह नेते, गटनेते आदी पदाधिकारी उपस्थित असतात. फक्त निवडणुकीशी संबंधित समित्यांचे सदस्यच उपस्थित राहतील असा फतवा मुंढे यांनी आधीच काढला होता. तरीही महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी पदाधिकारी नेहमीच उपस्थित असतात, तसे संकेत आहे, असे सांगत त्यांच्या उपस्थितीची परवानगी मागितली.
मुंढे यांनी त्याला नकार दिला; मात्र महापौर, उपमहापौर उपस्थित राहू शकतील असे नंतर सांगितले. मग या पदाधिकाऱ्यांच्या बसण्याच्या जागेवरून प्रश्न निर्माण झाला. महापौर व उपमहापौर पीठासीन अधिकाऱ्यांच्या शेजारी बसतील असे मुंढे यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी त्याला नकार दिला. सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी, आमचे काही म्हणणे नाही, आम्ही सभागृहातच येणार नाही असे सांगितले. मात्र, त्याच वेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी हा महापौरांचा अपमान आहे अशी भूमिका घेतली. मात्र, विरोधकांनी सर्व समित्यांची निवडणूक लढवली. (प्रतिनिधी)
>तुम्हीच मुंढे कशावरून?
तुकाराम मुंढे यांनी नगरसेवकांना ओळखपत्र दाखविण्यास सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेचे अविनाश साळवे यांनी सभागृहातच मुंढे यांना ‘तुम्हीच मुंढे कशावरून’ असा प्रश्न विचारला. मुंढे यांनी त्यांना शांतपणे स्वत:चे छायाचित्र असलेले ओळखपत्र दाखवले. महापालिकेची प्रथा, परंपरा, संकेत समजावून न घेता मुंढे वागले. यापूर्वीच्या निवडणुकीत कधीही असे झाले नव्हते. भाजपाला त्याचे काहीही वाटत नाही हेच आमच्यासाठी खेदजनक आहे. महापौर व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये असा नियम असेल, तर मुंढे यांनी तो दाखवावा. -चेतन तुपे, विरोधी पक्षनेते
>सर्व समित्यांमध्ये आमचाच विजय होणार होता. त्यांनी नियमांचे पालन केले. आमचे त्याविषयी काहीही म्हणणे नाही. महापौरांचा अवमान वगैरे काही नाही. नियम होता, तो त्यांनी सांगितला, आम्ही ते ऐकले. यापेक्षा वेगळे काहीही झालेले नाही.
- श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते
>कचरा संकलन गाड्यांवरील वाहक घेतले पीएमपीने काढून
पुणे : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वाहनांसाठी पीएमपीच्या नियुक्त करण्यात आलेल्या तब्बल ८३ चालकांना तातडीने शनिवारपासून (दि.८) पुन्हा पीएमपीमध्ये रुजू होण्याचे आदेश पीएमपीएमएलचे व्यवस्थाकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. मुंढे यांनी महापालिकेला दिलेला हा पहिलाच मोठा
दणका असून, शहरातील कचरा संकलनाचे काम यामुळे ठप्प होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या व्हेईकल डेपोकडे कचरा संकलनासाठी ५४६ गाड्या आहेत. त्यावर हे चालक दोन शिफ्टमध्ये काम करतात. त्यात काही ठेकेदारांकडून घेतलेले चालक असून, ८३ चालक पीएमपीएचे आहेत. व्हेईकल डेपोकडे चालकांची कमतरता असल्याने पीएमपीकडे जादा असलेल्या चालकांना कचरागाड्यांसाठी वापरले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हे
चालक महापालिकेच्या सेवेत आहेत. मात्र या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार पीएमपी करते. त्यामुळे
मुंढे यांनी या सर्व व्हेईकल डेपोकडील चालकांना
तातडीने पीएमपीकडे रुजू
होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, त्याचा परिणाम थेट कचरा संकलनावर होणार आहे.

Web Title: The municipal corporation is also contentious for one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.