महाराष्ट्र राज्य लॉटरी वाचविण्यासाठी मुनगंटीवार समिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:23 IST2025-03-22T14:22:26+5:302025-03-22T14:23:30+5:30
राज्य लॉटरी बंद करण्यात येणार असल्यासंदर्भात पहिले वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. लॉटरीवरील आस्थापना खर्च अधिक आणि सोबतच तोटाही अशी स्थिती असल्याने ती बंद करण्याच्या हालचाली सुरू होत्या.

महाराष्ट्र राज्य लॉटरी वाचविण्यासाठी मुनगंटीवार समिती
मुंबई : महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू ठेवायची तर तिच्यापासूनचे उत्पन्न कसे वाढविता येईल, याचा अभ्यास करून राज्य सरकारला शिफारशी करण्यासाठी माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात येणार आहे.
राज्य लॉटरी बंद करण्यात येणार असल्यासंदर्भात पहिले वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. लॉटरीवरील आस्थापना खर्च अधिक आणि सोबतच तोटाही अशी स्थिती असल्याने ती बंद करण्याच्या हालचाली सुरू होत्या. २०२३-२४ मध्ये तीन कोटी रुपयांहून अधिकचा तोटा झाला होता. लॉटरी बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली होती. केरळमधील राज्य लॉटरी मोठ्या नफ्यात आहे. तेथील तसेच काही राज्यांमधील सरकारी लॉटऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आमदारांची एक समिती दौरा करील. लॉटरी अधिक व्यवहार्य करण्याच्या दृष्टीने अभ्यास करून सरकारला अहवाल देईल.