आठवडी बाजाराला मुंबईकरांचा प्रतिसाद; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
By Admin | Updated: August 15, 2016 05:07 IST2016-08-15T05:07:06+5:302016-08-15T05:07:06+5:30
राज्य सरकारने कृषीमाल नियमनमुक्त केल्यानंतर शेतीमाल थेट ग्राहकांच्या दारात विकण्याचे प्रयोग सुरू

आठवडी बाजाराला मुंबईकरांचा प्रतिसाद; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : राज्य सरकारने कृषीमाल नियमनमुक्त केल्यानंतर शेतीमाल थेट ग्राहकांच्या दारात विकण्याचे प्रयोग सुरू झाले असून, रविवारी विधान भवन परिसरात मुंबईतील पहिल्या संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजाराचे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केले. थेट शेतातून आलेला हिरवागार ताजा भाजीपाला पाहून सुखावलेल्या मुंबईकरांनाही त्यास प्रतिसाद देत, मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
सहकार, पणन, वस्त्रोद्योग आणि राज्य कृषी पणन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विधान भवन परिसरात रविवारी पहिला आठवडी बाजार भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. राजू शेट्टी, खा. अरविंद सावंत यांच्यासह स्थानिक आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘शेतकरी आठवडी बाजारात फक्त शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक सहकारी संस्था यांचा समावेश असणार आहे. बाजाराच्या माध्यमातून ग्राहकांना ताजा भाजीपाला व फळे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.’ (प्रतिनिधी)
>मुख्यमंत्र्यांच्या भाजीचे
सावंत यांनी दिले पैसे!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवडी बाजारातील सर्व स्टॉल्सना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी आदिवासी विकास विभागातर्फे लावलेल्या स्टॉलवर कुरडू, भारंगी, टाकला या रानभाज्यांसह इतर भाजीपाला घेतला. मात्र, त्यांच्याकडे पैसे नसल्याने शिवसेनेचे खा. अरविंद सावंत यांनी त्यांचे पैसे दिले. फडणवीस हे खा. राजू शेट्टी यांच्या स्टॉलवर पोहोचले. ढोबळी मिरची, कारले, हिरव्या मिरच्या तेथील स्टॉलवर होत्या. सदाभाऊ खोत यांनी स्टॉलवरील ताज्या हिरव्या मिरच्या मुख्यमंत्र्यांसमोर धरत ‘आमच्या हातात नेहमी मिरच्याच...’ अशी मिश्कील टिप्पणी करताच, मुख्यमंत्र्यांसह उपस्थितांनी हसून दाद दिली.
>जलयुक्त शिवारनंतर मुख्यमंत्र्यांनी पाठबळ दिलेली ही दुसरी महत्त्वाकांक्षी योजना आहे. थेट बांधावरच्या शेतकऱ्याला मंत्रालयात आणता आले, याचे मोठे समाधान आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देता आले. या पुढच्या काळात मुंबई उपनगरासह आठवडी बाजारांची संख्या १०० पेक्षा अधिक असेल. मुंबईकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आमचे मनोबल वाढले आहे.
- सदाभाऊ खोत,
पणन राज्यमंत्री
>शेतकऱ्यांना अडत्यांपासून मुक्त करून त्यांच्या श्रमाचे उचित मूल्य मिळवून देण्यासाठी शेतकरी गट आणि शेती उत्पादक कंपन्यांनी क्लस्टर तयार करावेत. त्यांच्या निर्मितीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री