आंदोलन काळातही मुंबईचा धान्य पुरवठा सुरळीत

By नामदेव मोरे | Updated: August 31, 2025 14:12 IST2025-08-31T14:10:24+5:302025-08-31T14:12:01+5:30

मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतरही मुंबई, नवी मुंबईतील धान्य पुरवठा सुरळीत आहे.

Mumbai's food supply remains smooth even during the protests | आंदोलन काळातही मुंबईचा धान्य पुरवठा सुरळीत

आंदोलन काळातही मुंबईचा धान्य पुरवठा सुरळीत

नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतरही मुंबई, नवी मुंबईतील धान्य पुरवठा सुरळीत आहे. दोन दिवसांत बाजार समितीमध्ये २२८८ वाहनांमधून जवळपास १९ हजार टन कृषी माल आला आहे. अपवाद काही विभाग वगळता बहुतांश ठिकाणी मालाचा सुरळीत पुरवठा करण्यात आला आहे. अन्नधान्याचा कोणताही तुटवडा निर्माण होणार नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनीही दिली आहे. 

आरक्षणाच्या लढ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मुंबई, नवी मुंबईत दाखल होत आहे. २८ ऑगस्टपासून हजारो आंदोलकांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही आश्रय घेतला आहे. मुंबईतील वाहतूककोंडी व बाजार समितीमधील आंदोलकांची उपस्थिती यामुळे व्यापार ठप्प होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. याविषयी काही प्रमाणात अफवाही पसरल्या जात होत्या; परंतु बाजार समिती प्रशासनाने आंदोलकांचे स्वागत करण्याबरोबर येथील सर्व मार्केटमधील व्यवहार सुरळीत होतील, याची दक्षता घेतली आहे. बाजार समिती सुरू राहील, असे स्पष्ट केले आहे. येथे मुक्कामाला आलेले व मुंबईत आंदोलनास जाणाऱ्यांनीही कृषी व्यापारास फटका बसणार नाही, याची काळजी घेतली आहे.  बाजार समितीच्या  कांदा, भाजी, फळे, धान्य व मसाला मार्केटमध्ये शुक्रवारी १,१८७ वाहनांमधून १० हजार टन कृषी मालाची आवक झाली होती. शनिवारी ११०१ वाहनांमधून जवळपास ९ हजार टन कृषी मालाची आवक झाली आहे. 

व्यापार पूर्वपदावर...
आंदोलनामुळे काही किरकोळ व्यापाऱ्यांनी खरेदीकडे पाठ फिरविली होती. वाहतूककोंडीमुळे चेंबूर व इतर काही अपवाद ठिकाणी अल्प प्रमाणात पुरवठा विस्कळीत झाला होता. कांदा, बटाटा मार्केटमध्येही आवक थोडी कमी झाली आहे. हे अपवाद वगळता व्यापार सुरळीत झाला आहे. 

भाजीपाल्याची आवक व जावक सुरळीत सुरू आहे. मुंबईकरांना भाजीपाल्याचा पुरवठा दोन्ही दिवस करण्यात आला आहे.
शंकर पिंगळे, संचालक, भाजी मार्केट

आंदोलनाच्या काळात फळ मार्केट सुरळीत सुरू आहे. फळांचा पुरवठाही व्यवस्थित होत आहे.
संजय पानरे, संचालक, फळ मार्केट 

बाजार समितीची पाचही मार्केट सुरळीतपणे सुरू आहेत. व्यापार व्यवस्थित होईल, याची काळजी घेतली जात आहे. 
पी. एल. खंडांगळे, सचिव, बाजार समिती 

Web Title: Mumbai's food supply remains smooth even during the protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.