कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 20:39 IST2023-05-14T20:38:56+5:302023-05-14T20:39:26+5:30
कोस्टल हायवेच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार असा पुतळा उभारणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली.

कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) रविवारी या निर्णयाची माहिती दिली.
गेटवे ऑफ इंडिया येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा शिंदे यांनी केली.
पहिल्यांदाच या ठिकाणी जयंती होते आहे. त्यामुळे त्याचा हा आनंद मोठा आहे. संभाजी महाराज यांची आज 366 वी जयंती होत असतानाच आजच्या या ठिकाणी अविस्मरणीय सोहळा पार पडत आहे. या ठिकाणी अनेक लोकांनी संभाजी महाराज यांना हरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या शौर्याविषयी काही इतिहासकरांनी काही वेगळे लिहिले असेल पण ती वस्तूस्थिती नाही, असे शिंदे म्हणाले.
शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा पाया रचला आणि संभाजी महाराज यांनी त्याला कळस चढावला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक पराक्रम केले आहेत. त्यांच्या शौर्याच्या आठवणी आपण जतन करणे गरजेचे असल्याचे मत शिंदे यांनी मांडले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 120 लढाया लढल्या होत्या, मात्र त्यांचा कधीही पराभव झाला नाही. जगात कुठे नसतील असे जलदुर्ग या ठिकाणी उभारले. हीच प्रेरणा घेऊन नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नौदलाच्या झेंड्यावर राजमुद्रेला स्थान दिले असल्याचे शिंदे म्हणाले.
नौदलाचा दिन आता सिंधुदुर्ग येथील जलदुर्गात साजरा होणार आहे. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते, त्यामुळे सरकार अस्तित्वात आल्यानंतर प्रथम तो निर्णय घेतल्याचेही शिंदे म्हणाले. कोस्टल हायवेच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार असा पुतळा उभारणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी केली.