भारतीय संघासाठी मुंबईकर खेळाडूंचे भरीव योगदान - शरद पवार
By Admin | Updated: July 30, 2016 22:40 IST2016-07-30T22:40:45+5:302016-07-30T22:40:45+5:30
भारतीय संघात मुंबईच्या खेळाडूंचे नेहमीच भरीव योगदान राहिलेले आहे. खऱ्या अर्थाने परिपूर्ण खेळाडू मुंबई संघाने भारतीय संघाला दिलेला आहे.

भारतीय संघासाठी मुंबईकर खेळाडूंचे भरीव योगदान - शरद पवार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - भारतीय संघात मुंबईच्या खेळाडूंचे नेहमीच भरीव योगदान राहिलेले आहे. खऱ्या अर्थाने परिपूर्ण खेळाडू मुंबई संघाने भारतीय संघाला दिलेला आहे. किंबहुना मुंबईच्या खेळाडूंचा भारतीय संघात दबदबा राहिलेला आहे, असे स्पष्ट मत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वतीने आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात पवार बोलत होते.
वांद्रे-कुर्ला संकुलातील शरद पवार इनडोअर अकादमीच्या सभागृहात एमसीएचा वार्षिक पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी एमसीए उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार, संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी उपस्थित होते. धमाकेदार फलंदाज शार्दुल ठाकूरला २०१४-१५ आणि २०१५-१६ सालचा एमसीए सर्वोत्तम फलंदाज आणि गोलंदाज या पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले.
यंदाच्या रणजी मौसमात श्रेयस अय्यरने १ हजार ३२१ धावांचा पाऊस पाडला. एस. वी. राज्याध्यक्ष पुरस्कारासह जस्टीस तेंडुलकर चषक आणि सर्वात जलद शतक पूर्ण करणारा खेळाडू असा बहुमान त्याने मिळवला. गेल्या वर्षी श्रेयसने ८०९ धावा केल्या होत्या. गोलंदाजीमध्ये शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ४१ बळी मिळवत शावक पगडीवाला चषकाला गवसणी घातली. गतवर्षी शार्दुलने ४८ बळी मिळवले होते. त्याच्या अचूक माऱ्यामुळे भल्या भल्या फलंदाजांची दांडी गुल झाली. शार्दुलची निवड वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात झालेली आहे. यंदाचा ‘दत्तू फडकर रणजी क्रिकेटर आॅफ द ईयर’ हा पुरस्कार श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांना विभागून देण्यात आला.
शार्दुल ठाकूरला २०१४-१५ सालचा जस्टीस तेंडुलकर चषक प्रदान करण्यात आला. शरद पवार ज्युनियर स्कॉलरशिप ही १६ क्रिकेटपटूंना प्रदान करण्यात आली. यात चार महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. रणजी सलामीवीर अखिल हेरवाडकर व जय बिस्ता यांना २३ वर्षांखालील स्तरावर चांगली कामगिरी केल्याच्या पार्श्वभूमीवर अनुक्रमे २०१४-१५ व २०१५-१६ सालासाठी गौरविण्यात आले. त्याचबरोबर कांगा लीग, ज्युनियर गटातील सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू , महिला क्रिकेट, पंच, ग्राऊंड्समन आयोजक यांच्यासह एमसीएकडून घेण्यात आलेल्या शालेय स्पर्धांसाठी पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.
शरद पवारांचा ‘फुलटॉस’
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात राजकारणातील दिग्गज आणि क्रिकेट जगतातील सुपरिचित शरद पवार यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच फुलटॉस टाकला. मुंबई संघाने ४१ वेळा रणजी विजेतेपद जिंकले आहे. मात्र पवार यांनी ४५ वेळा मुंबई विजयी असा उल्लेख केला. पवारांच्या या फुलटॉसमुळे साहेबांनी खरेच निवृत्ती घ्यावी, अशी चर्चा दबक्या आवाजात सभागृहात रंगली.