मुंबईतील कर्जत-लोणावळा रेल्वे रुळावर गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या अज्ञात मृतदेहाचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले. पोलिसांनी आंध्र प्रदेशातील एका पुरूष आणि एका महिलेला बेंगळुरूमधील एका हॉटेलमधून अटक केली. मृत महिला आणि आरोपी यांच्यात किरकोळ कारणांवरून भांडण झाले. भांडण इतके वाढले की, आरोपींनी तिची हत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कर्जत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी सांगितले की, '१६ एप्रिल २०२५ रोजी पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाजवळ गुलाबी सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला. ठाकूरवाडी स्थानकाजवळ आरोपींनी चालत्या ट्रेनमधून सुटकेस फेकली असावी, असा पोलिसांना संशय होता. मृत महिला कोण होती, ती कुठून आली आणि तिला कोणी मारले? पोलिसांकडे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नव्हते. त्यानंतर पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कर्जत रेल्वे स्थानकांवर बसविण्यात आलेले सुमारे २५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.'
तपासणी दरम्यान, १५ एप्रिल २०२५ रोजी एलटीटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर एक तरुण आणि एक तरुणी गुलाबी सुटकेसह दिसले. त्यानंतर दोघेही रात्री १०.१७ मिनिटांनी मुंबई कोइम्बतूर एक्सप्रेसच्या (क्रमांक १०१४९६) ए-१ एसी डब्यात चढले. पोलिसांनी या डब्यातून प्रवास करणाऱ्या सर्व ५२ प्रवाशांची माहिती आणि आरक्षणासाठी दिलेले मोबाईल क्रमांक गोळा केली. दोन्ही आरोपी बंगळुरूत उतरल्याचा पोलिसांना समजले. त्यांनी बेंगळुरू रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांच्याकडे कोणतीही सुटकेस दिसली नाही. यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. पोलीस आरोपींच्या घरी गेले असता, ते तिथे नव्हते. यानंतर नंतर पोलिसांनी दोघांचा नंबर ट्रॅक करून त्यांचा शोध घेतला. दोघांनाही बेंगळुरूमधील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली.
पोलिसांनी चौकशी केली असता दोघांनीही सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर दिली. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी हत्येची कबूली दिली. व्ही विजयकुमार व्यंकटेश (वय, २६) आणि यशस्विनी राजा तातीकोलू (वय, २४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. व्यंकटेश बी.टेकचा विद्यार्थी आहे. तर, यशस्विनी पदव्युत्तर आहे. धनलक्ष्मी रेड्डी (वय, ३४) असे मृत महिलेचे नाव आहे. धनलक्ष्मी रेड्डीशी भांडण झाले होते. त्यानंतर दोघांनी मिळून धनलक्ष्मीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून रेल्वे रुळावर फेकून दिला.