मुंबई-ठाण्यासह राज्यभर कोसळधार

By Admin | Updated: August 1, 2016 04:54 IST2016-08-01T04:54:02+5:302016-08-01T04:54:02+5:30

मुंबई महानगर प्रदेशात रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार वृष्टीने ठाणे व रायगड जिल्ह्याला झोडपून काढले.

Mumbai-Thanhweh state collapsed | मुंबई-ठाण्यासह राज्यभर कोसळधार

मुंबई-ठाण्यासह राज्यभर कोसळधार


मुंबई/ठाणे/रायगड : मुंबई महानगर प्रदेशात रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार वृष्टीने ठाणे व रायगड जिल्ह्याला झोडपून काढले. शहापूर तालुक्यात धबधब्याच्या पाण्यात बुडून गिर्यारोहकाचा मृत्यू झाला. तर १२ पर्यटकांसह परीक्षेसाठी आलेले ६० विद्यार्थी असे ७२ जण भिन्न ठिकाणी पाण्यात अडकले. पारसिक बोगद्याजवळ रुळांवर पाणी साठल्याने सकाळी काही काळ मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक बंद पडल्याने २२ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. नंतर दिवसभर पावसामुळे मुंबईतील तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा अर्धा तास उशिराने धावत होती.
रविवारी ठाणे व रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असताना मुंबईत तुलनेत पावसाचा तडाखा कमी होता. त्यामुळे मुंबईकरांनी मरिन ड्राइव्ह, वरळी सी-फेस आदी समुद्रकिनारी गर्दी करत पावसाचा आनंद लुटला. रविवार सकाळपासून सायंकाळपर्यंत मुंबई शहरात १५.२१ मिलीमीटर, पूर्व उपनगरात ७४.९० मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात ६३.५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. उपनगरात झालेल्या अतिवृष्टीमुळे
मुलुंड, घाटकोपर, चेंबूर, दहिसर, वांद्रे, बोरीवली आणि मालाडमध्ये पाणी
साचले होते.
पवई येथील इंदिरा नगरलगतची
दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आल्याने रहिवाशांना घरे रिकामी
करण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. दिवसभरात १७ ठिकाणी झाडे पडल्याचे व पाच ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
>ठाण्यात धो धो कोसळला; शहर परिसरात १७९ मिमी पाऊस
ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण या शहरांत सर्वाधिक पाऊस झाला असला तरी त्यासोबतच डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, भार्इंदर-मीरा रोड या शहरांना आणि मुरबाड-शहापूर तालुक्यांना पावसाने तडाखा दिला. मात्र, रविवारचा सुटीचा दिवस असल्याने रेल्वे स्थानकांत-रस्त्यांवर फारशी गर्दी नव्हती. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस ठाणे शहर परिसरात १७९ मिमी इतका झाला. या मुसळधार पावसामुळे ठाणे व मुंब्रा परिसरातील रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने दुपारी तास-दीड तास कल्याण ते ठाणेदरम्यानची उपनगरी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
७२ जण अडकले
ठाणे शहरात भिंत कोसळण्यासह पाच ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. मानपाडा, पातलीपाडा, कोपरी बसस्थानक, दत्तवाडी, हिरानंदानी इस्टेट, वंदना चित्रपटगृह, मुंब्रादेवी कॉलनी आणि आलिशान टॉकीज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. घोडबंदर परिसरात पिकनिकसाठी आलेले १२ पर्यटक अडकले, तर शाळेत परीक्षेसाठी आलेली ६० मुले असे ७२ जण साचलेल्या पाण्यामुळे अडकून पडले होते. मात्र, त्यांची सुखरूप सुटका झाली.
धरणे भरू लागली
पावसाने धरणांतही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. भातसा धरणात ७५ टक्के, तर बारवी धरणात ५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. उल्हास नदीत पाणी सोडून विविध महापालिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणाऱ्या आंध्रा धरणात ३१.४९ टक्के पाणीसाठा आहे. मोडकसागरमध्ये ७३.७६ टक्के, तर तानसात ७८.८३ टक्के पाणीसाठा आहे.
>गिर्यारोहकाचा मृत्यू
शहापूर : माहुली गडावर धबधब्यातून रॅपलिंग करण्यासाठी दोर बांधत असताना पाय घसरून विक्र ांत विजय जगताप (२८) या गिर्यारोहकाचा मृत्यू झाला. गिर्यारोहणासाठी रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कल्याणचे पाच तरुण माहुली गडावर आले होते. नाश्ता आटोपून त्यांनी सकाळी साडेनऊच्या दरम्यान रॅपलिंगसाठी दोर बांधण्यास सुरुवात केली,
तेव्हा पाय घसरून विक्र ांत जगताप धबधब्यातून थेट कुंडात कोसळला. धबधब्यातील पाण्याचा जोर
अधिक होता.
त्याला वाचविण्याचा सहकाऱ्यांनी प्रयत्न केला; पण त्याचा उपयोग झाला नाही, असे त्याच्यासोबत आलेल्या अजिंक्य वाघमारे यांनी
शहापूर पोलिसांना सांगितले.

Web Title: Mumbai-Thanhweh state collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.