प्रभाग रचनेसाठी मुंबई महानगरपालिकेकडे आल्या ४१० सूचना अन् हरकती; आवाहनाला थंड प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 07:49 IST2025-09-05T07:48:28+5:302025-09-05T07:49:09+5:30
मुंबईत २२७ प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार आहेत. त्याबाबतचे सर्वेक्षण महापालिकेकडून नुकतेच पूर्ण करण्यात आले

प्रभाग रचनेसाठी मुंबई महानगरपालिकेकडे आल्या ४१० सूचना अन् हरकती; आवाहनाला थंड प्रतिसाद
मुंबई : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेसंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडे २३ ऑगस्टपासून ४ सप्टेंबरपर्यंत ४१० हरकती व सूचना आल्या. यासंदर्भातील सूचना व हरकतीची माहिती पालिकेकडून घेतली जात असून, अद्याप त्यांची छाननी सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महापालिकेच्या २०१७च्या निवडणुकांवेळी ६१३ सूचना व हरकती प्राप्त झाल्या होत्या.
मुंबईत २२७ प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होणार आहेत. त्याबाबतचे सर्वेक्षण महापालिकेकडून नुकतेच पूर्ण करण्यात आले. २०११च्या जनगणनेचा आधार घेऊन नवीन प्रभाग रचना करण्यात आली आहे. मात्र, त्यात कोणतेही मोठे बदल नाहीत. फक्त प्रभागातील लोकसंख्या आणि झालेले विकासात्मक बदल यामुळे प्रभागाच्या हद्दी कमी अधिक झाल्या आहेत.
दरम्यान, नगर विकास विभागाच्या सूचनेनुसार प्रभाग रचनेसाठी सूचना व हरकती २२ ऑगस्टपासून मागवण्यास सुरुवात केली. पहिल्या ९ दिवसांतच फक्त १७ हरकतींची नोंद झाली हाेती. ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान ३९३ हरकतीची भर पडली आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत हरकती व सूचना याबाबत माहिती संकलन सुरू असल्याने त्यात भर पडण्याची शक्यता आहे.
सुनावणी सुरुवात
महापालिकेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ५ ते १२ सप्टेंबरदरम्यान हरकती व सूचना यांवर सुनावणी होणार असून, मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त तथा सनदी अधिकारी इक्बाल सिंग चहल हे महापालिकेच्या हरकती व सूचना याबाबत सुनावणी घेणार आहेत.