Mumbai Drug Case: देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याच्या इशाऱ्याला नवाब मलिकांचं तीन शब्दांत प्रत्युत्तर म्हणाले, ‘है तैयार हम’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 14:34 IST2021-11-01T14:33:47+5:302021-11-01T14:34:27+5:30
Nawab Malik, Mumbai Drug Case: नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष Sharad Pawar यांच्याकडे सोपवणार असल्याचा इशारा Devendra Fadnavis यांनी दिला होता. त्याला आता नवाब मलिक यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Mumbai Drug Case: देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याच्या इशाऱ्याला नवाब मलिकांचं तीन शब्दांत प्रत्युत्तर म्हणाले, ‘है तैयार हम’
मुंबई - नवाब मलिक यांनी केलेला ड्रग्स पेडलर्सशी संबंध असल्याचा आणि महाराष्ट्रातील ड्रग्स व्यवसायाचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला होता. तसेच नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्याला आता नवाब मलिक यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले असून, है तैयार हम असे केवळ तीन शब्दांचे ट्विट केले. त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे.
है तैयार हम @Dev_Fadnavis
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने मुंबईमध्ये ड्रग्सचा व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. यावेळी ते म्हणाले की, ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांचे नदी संरक्षणाबाबत एक गाणे आले होते. त्या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही काम केले होते. तर अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गायन केले होते. त्या गाण्याच्या निर्मितीसाठीचा फायनान्शियल हेड म्हणून काम पाहत होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. महाराष्ट्रातील ड्रग्सच्या खेळाचे मास्टर माईंड हे देवेंद्र फडणवीस आहेत की काय अशी आम्हाला शंका आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक सध्या कोणत्या मानसिकतेमध्ये आहेत, हे सर्वांना माहिती आहे. नवाब मलिक यांनी लंवगी फटाकडी लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहे. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याबाबत बोलू नये आणि, आणि ड्रग्सबाबतही बोलू नये. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन उघड करणार असून, याचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनाही देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.