मुंबईतील चेंबूर येथील गोवंडी परिसरात १३ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४० वर्षीय क्रिकेट प्रशिक्षकाला अटक करण्यात आली. हा संतापजनक प्रकार देवनार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका महानगरपालिकेच्या मैदानावर घडला. या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
आयएनएस या वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घारकोपरमधील पंतनगर येथील रहिवाशी असून गोवंडी परिसरातील एका मैदानावर असलेल्या क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घ्यायची, जिथे क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितेने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी ताबडतोब पंतनगर पोलीस ठाणे गाठले. परंतु, हा प्रकार देवनार परिसरात घडल्याने, याचा तपास देवनार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी क्रिकेट प्रशिक्षक अटक केली. आरोपी माजी रणजी खेळाडू असल्याचे समजत आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
पीडिताच्या असामान्य वागण्यामुळे तिच्या पालकांना संशय निर्माण झाला. पालकांनी विश्वासात घेऊन विचारल्यावर तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. आरोपीने पीडितेला या घटनेबाबत कुठेही काहीही न सांगण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती गप्प राहिली, अशी प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र पवार (वय, ४१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो गोवडी येथील रहिवाशी आहे. अटकेनंतर पोलिसांना आढळले की, आरोपीवर यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.