प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनावर असलेल्या बंदीमुळे गेल्या दिवसांपासून विसर्जनाच्या प्रतिक्षेत असलेल्या चारकोपच्या राजाचे आज अखेर विसर्जन होत आहे. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर तब्बल ११७ दिवसांनी चारकोपच्या राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. धानुकर वाडी येथील तलावात चारकोपच्या राजाचे विसर्जन करण्यात येत आहे.
'प्लास्टर ऑफ पॅरिस'पासून बनवलेल्या गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे चारकोपच्या राजाचे विसर्जन रखडले होते. 'चारकोपचा राजा' मंडळ वगळता इतर सर्व मंडळांनी आपापल्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच केले. परंतु, पुढील निर्णयापर्यंत गणेशमूर्ती मंडपातच ठेवण्याचा निर्णय या मंडळाने घेतला. चारकोपच्या राजाचे विसर्जन न झाल्यामुळे गणेशभक्तांमध्ये बाप्पाच्या विसर्जनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तब्बल १७७ दिवसांपासून मंडपातच विराजमान राहिलेल्या चारकोपच्या राजा आजच विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.
चारकोपच्या राजाच्या विसर्जनामागे तब्बल सहा महिन्यांचा मोठा संघर्ष असून, कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहत बाप्पा इतका काळ मंडपातच विराजमान होता. आता न्यायालयीन परवानगी मिळाल्यानंतर बाप्पाच्या विसर्जनासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उत्साहात सहभागी झाले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात चारकोपच्या राजाचे विसर्जन केले जाणार आहे.