उच्चभ्रू सोसायटीतील क्लबवर मुलुंडमध्ये धाड
By Admin | Updated: September 8, 2014 03:13 IST2014-09-08T03:13:57+5:302014-09-08T03:13:57+5:30
मुलुंड पश्चिमेकडील हिल रेसिडेन्सीसारख्या उच्चभ्रू सोसायटीतील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर समाजसेवा शाखेने धाड टाकत हा अड्डा उधळला.

उच्चभ्रू सोसायटीतील क्लबवर मुलुंडमध्ये धाड
मुंबई : मुलुंड पश्चिमेकडील हिल रेसिडेन्सीसारख्या उच्चभ्रू सोसायटीतील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर समाजसेवा शाखेने धाड टाकत हा अड्डा उधळला. यात १७ जणांसोबत ६ महिलांना जुगार अॅक्टखाली गजाआड केले आहे. त्यांच्याकडून साडेतीन लाखांची रोकडही जप्त केली.
मुलुंड हिल रेसिडेन्सीमधील सहाव्या मजल्यावरील बंद घरात हा प्रकार सुरू होता. शनिवारी रात्री ८च्या सुमारास समाजसेवा शाखेने हा जुगाराचा अड्डा उधळून लावत २३ जणांना जुगार खेळताना रंगेहाथ अटक केली. यामध्ये ६ महिलांचाही समावेश आहे. या छाप्यात साडे तीन लाखांची रोकडही जप्त करण्यात आली.
कलावंती जसवंत कोठारी (६५) या महिलेने ज्योतीबेन भरत शहा या महिलेस हा फ्लॅट भाड्याने दिला होता. ज्योतीबेन शहाने क्लबच्या नावाखाली येथे जुगार खेळविणे सुरू केले. आरोपी महिला मेकपमन असून ठाणे, डोंबिवली परिसरात अशा प्रकारे भाड्याच्या घरात एका दिवसासाठी क्लबच्या नावाखाली जुगार भरविते. ज्योतीबेन शहा ही मुलुंडमध्येच राहण्यास आहे. या महिलेसह एकूण २३ जणांवर जुगार अॅक्टखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)