अमोल अवचित्ते-
पुणे : राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा घेतलेल्या निर्णयाची आयोगाला काहीच माहिती नव्हती. तो अचानक घेतलेला निर्णय आहे. राज्य सरकारचा कोणताही पत्रव्यवहार आयोगाशी झाला नाही किंवा परीक्षा पुढे ढकलण्याबाबत पत्र देखील आलेले नाही. त्यामुळे आयोगाने अद्यापपर्यत संकेतस्थळावर घोषणा केलेली नसली तरी आयोग शासनाच्या विरोधात जाणार नाही. त्यामुळे परीक्षा पुढेच ढकलल्या जाणार आहेत असे महाराष्ट्र लोकसेेवा आयोगातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करण्याची आवश्यकता नसून परीक्षा पुढे ढकलली जाणार हे गृहीत धरून तयारी करावी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटरवरून देण्यात आली होती. यावर आयोगाने कोणतीही अधिकृत माहिती संकेतस्थळावरून दिली नसल्याने परीक्षार्थी संभ्रमात आहेत.
आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांबाबत सर्वतोपरी निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाला आहे असे असताना मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयाबद्दल अधिकृत घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर न झाल्याने परीक्षा पुढे ढकली जाणार की नाही. तसेच परीक्षेच्या पुढील तारखांबाबत आयोगाने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. यामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
...... दुटप्पी भूमिका घेऊन राज्य सरकार प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ करतेय आयोगाने परीक्षा घेण्याची तयारी दर्शीविली होती. त्यावर उपाय म्हणून आरोग्याची काळजी घेण्यासाठी निविदा देखील काढली होती. असे असताना सर्वच परीक्षा पुढे ढकलून सरकारला नेमके काय साधायचे आहे. कोरोनासोबत जगले पाहिजे असे एकीकडे सरकार सांगून जीवनमान सुरळीत करत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे नाव पुढे करत परीक्षा रद्द करण्याचे धोरण राबवत आहे, अशी दुटप्पी भूमिका घेऊन प्रामाणिकपणे अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ करत आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून परीक्षा घेण्यात याव्यात. - राजेश मुळे, स्पर्धा परीक्षार्थी. ........ जरी १ वर्ष वय वाढवून दिले तरी आधीच वाढत चाललेल्या वयाचे काय? सरकारने आयोगाला केवळ केंद्र बदलून देउन विद्यार्थ्यांना आपापल्या जिल्ह्यात परीक्षा देण्याचा निर्णय घेणे अपेक्षित होते. परीक्षा पुन्हा पुढे ढकलणे, हा निर्णय अतिशय चूकीचा आहे. जर आयोग कोविड १९ सुरक्षेसंदर्भात सर्व प्रकारच्या उपाययोजना करून परीक्षा घेण्यास तयार असेल, तर या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा. विद्यार्थी प्रचंड मानसिक आणि आर्थिक तणावाखाली आहेत. जरी १ वर्ष वय वाढवून दिले तरी आधीच वाढत चाललेल्या वयाचे काय? विद्यार्थी स्वतःची काळजी घेण्यास सक्षम असतील तर परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? - विजय राठोड, स्पर्धा परीक्षार्थी. .... आयोग शासनाच्या विरोधात जाणार नाही राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची आयोगाला माहिती नव्हती. अचानक घेतलेला निर्णय आहे. राज्य सरकारचा कोणताही पत्रव्यवहार आयोगाशी झाला नाही किंवा परीक्षा पुढे ढकलण्याबाबत पत्र देखील आलेले नाही. त्यामुळे आयोगाने अद्यापपर्यत संकेतस्थळावर घोषणा केलेली नसली तरी आयोग शासनाच्या विरोधात जाणार नाही. त्यामुळे परीक्षा पुढेच ढकल्या जाणार आहेत. असे आयोगातील सूत्रांनी सांगितले.